एकीकडे निवडणुक मतमोजणीची धांदल उडाली असताना सायंकाळी मान्सूनपूर्व पावसाने सांगली जिल्ह्यात बहुतांशी ठिकाणी झोडपून काढले. दमदार पाऊस पडत असतानाही कार्यकर्ते गुलालाने माखलेल्या स्थितीत विजयाचा आनंद सांगलीत साजरा करत होते. दिवसभराच्या तीव्र उष्म्यानंतर सायंकाळी साडेतीन वाजल्यानंतर सुमारे एक तास पावसाने दमदार हजेरी लावली. पावसाने शहरातील रस्ते तर जलमय झाले होतेच, पण ग्रामीण भागात ओढे, नाले यांनाही यंदाच्या हंगामात पहिल्यांदाच पाणी आले.
मिरज, सांगलीसह तासगाव, भिलवडी, अंकलखोप, पलूस आदी ठिकाणी दमदार पाउस झाला आहे. मान्सूनपूर्व पाउस झाल्याने आता मृग नक्षत्राच्या पेरणीला हा पाउस पोषक ठरणार आहे. दोन दिवसात मान्सूनचे आगमन होणार असून त्यानंतर खरीप पेरण्याची धांदल उडणार आहे.
तासगाव परिसरात दमदार पाउस झाल्याने खरीपाच्या पेरणीला उपयुक्त ठरणार असून द्राक्ष बागेची काडी तयार होण्यासाठी हा पाउस उपयुक्त ठरणार आहे.
