मुख्यमंत्री शिंदे यांचे बालेकिल्ल्यात शक्तिप्रदर्शन; नरेश म्हस्के यांच्या प्रचारासाठी ठाण्यात ‘रोड शो

ठाणे लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोपरी-पाचपाखाडी परिसरात जोरदार शक्तिप्रदर्शन केले. हा मुख्यमंत्र्यांचा विधानसभा मतदारसंघ असल्याने तेथून आपल्या पक्षाला सर्वाधिक मतदान व्हावे, हा त्यांचा प्रयत्ना असून त्यासाठी त्यांनी मतदारांना साद घातली.

कोपरी-पाचपाखाडीमध्ये रविवारी संध्याकाळी म्हस्के यांच्या प्रचारफेरीचे आयोजन करण्यात आले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेही या प्रचारफेरीत सहभागी झाले. कोपरी-पाचपाखाडी परिसर हा आनंद दिघे यांचा बालेकिल्ला आहे. येथून तुम्ही मला निवडून दिले. त्यामुळे मी मुख्यमंत्री झालो. येत्या निवडणुकीत धनुष्यबाणाला मतदान कराल असा शब्द द्या, असे आवाहन शिंदे यांनी केले. तसेच ही निवडणूक केवळ ठाण्याची नाही, तर देशाच्या विकासाची निवडणूक आहे. आपल्या देशाला महासत्ता बनविणारी ही निवडणूक आहे. नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवायचे आहे, असेही शिंदे म्हणाले. तुम्ही २४ तास काम करणाऱ्यांना निवडून द्याल की, घरात बसून फेसबुक लाईव्ह करणाऱ्यांना निवडून द्याल, असा टोलाही त्यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता लगावला. संपूर्ण ठाणे लोकसभा मतदारसंघात कोपरी पाचपाखाडीमधून सर्वाधिक मतदान झाले पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *