मंगळवारी नालासोपाऱ्यात गॅस पाईप फुटून द्वारका हॉटेलला आग लागल्याची घटना ताजी असतानाच बुधवारी विरार पश्चिमेच्या भागात मिसळ दुकानाला भीषण आग लागली होती. सकाळी पावणेआठच्या सुमारास ही घटना घडली. या आगीत दुकान जळून खाक झाले आहे.
विरार पश्चिमेच्या रेल्वे स्थानकाजवळील गावठण रस्त्यावर आनंद लक्ष्मी इमारत आहे. त्यातील गाळा क्रमांक ५ आणि ६ मधील घुमटकर मिसळचे दुकान आहे. बुधवारी सकाळी पावणेआठच्या सुमारास या दुकानात अचानकपणे आग लागली होती. त्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली होती. या घटनेची माहिती पालिकेच्या विरार अग्निशमन केंद्राला मिळताच घटनास्थळी पोहोचून आगीवर नियंत्रण मिळविण्याचे काम सुरू करण्यात आले होते मात्र आगीने अधिकच पेट घेतल्याने इमारतीमध्ये धुराचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे तातडीने या इमारतीमध्ये राहत असलेल्या नागरिकांना अग्निशमन दलाच्या जवानांनी बाहेर काढले. तर दुकानात असलेले सात सिलेंडरसुद्धा बाहेर काढण्यात आले.
