मसाल्याच्या मिरचीचा उतरला तोरा, तर आता लसणाची फोडणी महागली, जाणून घ्या आजचे दर

गेल्या वर्षभरापासून बाजारात लसणाची आवक घटल्याने लसणाच्या दराने आतापर्यंतचा सर्वाधिक दर गाठला आहे. घाऊक बाजारातच लसूण ३०० ते ३७०, ३८० रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे किरकोळ बाजारात एक किलो लसणाचे दर ५०० रुपये किलोवर पोहोचले आहेत. नवीन पीक बाजारात आल्यावरच दर उतरण्याची शक्यता असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. मागील दोन-तीन वर्षांपासून लसणाचे दर कमी होते. शेतकऱ्यांनी लसणाची लागवड मोठ्या प्रमाणात केल्याने बाजारात मोठ्या प्रमाणात लसणाची आवक होत होती. पुरवठा जास्त, मागणी स्थिर असल्याने लसणाच्या किमती घसरल्या होत्या. परिणामी, गेल्या वर्षी शेतकऱ्यांनी लसणाची लागवडच केली नाही. त्यामुळे गेल्या वर्षीपासून बाजारात लसणाची कमतरता जाणवण्यास सुरुवात झाली असून दरही वाढले आहेत. सध्या घाऊक बाजारात लसणाच्या १० गाड्या येत आहेत. त्यामुळे बाजारातील आवक निम्म्यावर आली आहे.

सर्वसाधारणपणे लसणाचे दर घाऊक बाजारात ५० ते १२० रुपये किलोपर्यंत असतात. मात्र आता हे दर २०० ते ३७० रुपये किलोपर्यंत गेले आहेत. हे दर पूर्वपदावर येण्यासाठी लसणाची आवक वाढणे अपेक्षित आहे. नवीन लसूण दरवर्षी मार्चनंतरच बाजारात येतो. त्यामुळे त्यानंतरच दर उतरण्यास सुरुवात होईल, अशी माहिती व्यापारी मनोहर तोतलानी यांनी दिली. ओल्या लसणाचीच आवक सध्या लसणाचे दर वाढले असल्याने काही व्यापारी शेतातील ओला लसूण बाजारात पाठवत आहेत. हा लसूण २०० ते २५० रुपये किलोने घाऊक बाजारात विकला जात आहे.

उन्हे तापायला सुरुवात झाली की अनेकजण मसाला करण्याच्या तयारीला लागतात. यावर्षी अगदी दिवाळीपासूनच लाल मिरचीचा ठसका वाढला होता. सुक्या मसाल्याच्या लाल मिरच्यांचे दर घाऊक बाजारातच ४०० ते ५०० रुपये किलो झाले होते. मात्र आता हे दर किलोमागे ५० रुपयांनी कमी झाले आहेत. वाशीतील घाऊक मसाला बाजारात सध्या लाल मसाल्याच्या मिरच्यांची आवक वाढू लागली आहे. सध्या मिरचीच्या १४ ते १५ गाड्या दररोज घाऊक बाजारात येत आहेत. फेब्रुवारी ते मार्च हा बाजारात मिरच्या येण्याचा मुख्य महिना असतो. त्यामुळे या काळात मसाला बाजारात सर्वत्र लाल मिरच्यांचा ठसका लागतो. एप्रिलमध्ये बहुतेक शाळांच्या परीक्षाही संपलेल्या असतात. त्यानंतर बहुतेक जण फिरण्यासाठी बाहेर जात असल्याने अनेकांचा कल त्याआधीच लाल मसाला तयार करून घेण्याकडे असतो. त्यामुळे फेब्रुवारी ते एप्रिलमध्ये मसाल्याच्या लाल मिरचीला जास्त मागणी असते. त्यानुसार लाल मिरचीला मागणी वाढू लागली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *