गेल्या आठवडय़ात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथे दोन लोकल समोरासमोर आल्या. यावेळी आपत्कालीन ब्रेक लागल्याने संभाव्य अपघात टळला. त्यामुळे हजारो प्रवाशांचे प्राण थोडक्यात बचावले. मात्र कल्याण-सीएसएमटी लोकलला लाल सिग्नल असतानाही मोटरमनच्या चुकीमुळे ही घटना घडल्याचे निष्पन्न झाले आहे. या घटनेमुळे त्यावेळी फलाट क्रमांक तीन आणि चारवरून ४० मिनिटांपर्यंत लोकलचे संचालन तात्पुरते स्थगित करावे लागल्याने अनेक लोकल उशिराने धावत होत्या. याप्रकरणी मोटरमनला निलंबित करण्यात आले आहे.
३१ ऑगस्ट रोजी दुपारी ३.२० वाजता सीएसएमटीच्या फलाट क्रमांक ४ वरून ठाण्याकडे जाणारी लोकल सुटली. याच वेळी कल्याण-सीएसएमटी लोकल लाल सिग्नल ओलांडून फलाट क्रमांक ४ च्याच दिशेने आली. लाल सिग्नल हे लोकल थांबवण्याचे संकेत असताना देखील मोटरमन एस.डी. श्रीखंडे यांनी लोकल पुढे नेली. यावेळी ही लोकल २९ किमी वेगाने जात होती. मात्र, सीएसएमटी-ठाणे लोकलच्या मोटरमनने त्वरित प्रसंगावधान राखत आपत्कालीन ब्रेक लावले. तर, कल्याण-सीएसएमटी लोकलच्या मोटरमनने लाल सिग्नलकडे दुर्लक्ष केल्याने ऑटोमॅटिक वॉर्निग सिस्टमने (एडब्ल्यूएस) मोटरमनला सतर्क केले. यावर मोटरमनकडून चार सेकंदांत प्रतिसाद न मिळाल्याने लोकलचे ब्रेक आपोआप लागू झाले. परिणामी दोन्ही लोकल ७५ मीटरच्या अंतरावर थांबल्या. या घटनेत लोकलमधील सुसज्ज असलेले अॅटोमॅटिक वॉर्निग सिस्टम (एडब्ल्यूएस) मुळे संभाव्य अपघात टळला. या घटनेनंतर एस.डी.श्रीखंडे यांना निलंबित करण्यात आले.
या घटनेचे नेमके कारण शोधण्यासाठी मध्य रेल्वेने कनिष्ठ प्रशासकीय दर्जाच्या अधिकाऱ्यांचा समावेश असलेली समिती स्थापन केली. या समितीच्या प्राथमिक निष्कर्षांवरून असे दिसून आले की, कल्याण-सीएसएमटीचे मोटरमन श्रीखंडे यांनी लाल सिग्नल ओलांडला.
