करोनामुळे शालेय विद्यार्थी मोबाइल आणि ‘टीव्ही’च्या आहारी गेल्याचे दुष्परिणाम समोर येऊन ते गृहपाठही विसरल्याचे आढळले. त्यातून त्यांना बाहेर काढण्यासाठी नाशिक महापालिकेच्या शंभर शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या ३५ हजार विद्यार्थ्यांच्या घरी सायंकाळी सात ते नऊदरम्यान ‘टीव्ही’ आणि मोबाइल बंद करण्याचा ‘डिसले पॅटर्न’ अवलंबिला जात आहे. आता हा नाशिकचा ‘पॅटर्न’ राज्यभरात राबविला जाणार आहे.
महापालिकेच्या वतीने वारकरी, कीर्तनकार संस्थांना आवाहन करून ग्रामीण भागात महापालिकेच्या या उपक्रमाचा प्रचार, प्रसार केला जाणार आहे. महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या प्रशासन अधिकारीपदाची जबाबदारी घेतल्यापासून बी. टी. पाटील यांनी वेगवेगळे उपक्रम राबवून शिक्षण विभागात सुधारणा सुरू केल्या आहे. महापालिका शाळांमध्ये अभिनव प्रयोग केले आहेत. महापालिकेच्या शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या मुलांमधील कलात्मक गुणांना चालना देण्यासाठी महापालिकेच्या शंभर शाळांमध्ये आता ‘दप्तरमुक्त शनिवार’ ही संकल्पना राबविली जात आहे. शनिवारी शाळेत केवळ सांस्कृतिक उपक्रम, विविध विषयांवर व्याख्याने, तसेच विविध खेळ खेळले जात आहेत. ‘टीव्ही’, मोबाइल हे शिक्षण आणि मनोरंजनाचे साधन असले, तरी त्यांच्या अतिवापराचे विपरित परिणाम आजच्या पिढीवर होत आहेत. करोनामुळे मुलांच्या हातात मोबाइल पडल्यापासून मुले मोबाइल, तसेच करमणुकीचे साधन म्हणून ‘टीव्ही’च्या आहारी गेली आहेत. त्यातून त्यांना बाहेर काढण्यासाठी महापालिकेच्या शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या ३५ हजार मुलांच्या घरी ‘डिसले पॅटर्न’ राबविला जात आहे. दररोज सायंकाळी सात ते नऊ वाजेदरम्यान टीव्ही, तसेच मोबाइल बंद ठेवून मुलांना अभ्यास करण्यास प्रोत्साहन दिले जात आहे. आता हाच ‘पॅटर्न’ राज्यभर राबविण्याचा संकल्प शिक्षण विभागाने सोडला आहे.
