उल्हासनगरमधील एका दाम्पत्याची चोरट्यांनी चोरीच्या उद्देशाने रात्रीच्या वेळेत घरात घुसून निर्घृण हत्या करुन ९२ हजारांचा सोन्याचा ऐवज लुटून नेला होता. पोलिसांनी या प्रकरणात चार जणांना अटक करुन त्यांच्यावर संघटित गुन्हेगारी कायद्याचे कलम लावले होते. ठाणे येथील विशेष मोक्का न्यायालयाचे न्यायाधीश अमित शेटे यांनी सबळ पुराव्याअभावी या प्रकरणातील चार आरोपींची मोक्कातून निर्दोष मुक्तता केली.
पोलिसांनी या प्रकरणात तपास करताना सबळ पुरावे दाखल केले नाहीत आणि आरोपींवरील आरोपांची सिध्दता करण्यास ते अपयशी ठरले आहेत, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. संजय रामू राऊत (४०), राजा मधू मुदलियार, राजा कारवेंडर (४०), प्रकाश सितापुरे (३८) अशी मोक्कातून निर्दोष मुक्तता झालेल्या आरोपींची नावे आहेत. बारा वर्षापूर्वी हत्येची घटना उल्हासनगर तीनमध्ये घडली होती.
सरकारी वकील ॲड. संजय मोरे यांनी न्यायालयात सरकारी पक्षाची बाजू मांडली. उल्हासनगर तीनमध्ये राहणारे गोवर्धन ढलवाणी (६५) केंद्रीय सुरक्षा दलात नोकरीला होते. निवृत्तीनंतर ते उल्हासनगर मधील आपल्या घरी (बॅरेक) पत्नी कविता सोबत राहत होते. त्यांच्या शेजारी त्यांची विवाहित मुलगी दीपा राठोड राहत होती. निवृत्तीनंतर गोवर्धन ढलवानी घरातून खाऊच्या वस्तु विक्रीचा व्यवसाय करायचे. पत्नी शिलाई काम करत होती. या मिळकतीवर त्यांचा चरितार्थ चालत होता. फेब्रुवारी २०११ मध्ये गोवर्धन यांची विवाहित मुलगी दीपा राठोड सकाळी शेजारी राहत असलेल्या आई-वडीलांच्या घर गेली. दरवाजाला बाहेरुन कडी होती. तिने दरवाजा उघडून घरात डोकावून पाहिले तर आई, वडिल रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. कपाटातील सोन्याचा ९२ हजाराचा ऐवज चोरीला गेला होता. चोरीच्या उद्देशातून ही हत्या झाल्याचे पोलीस तपासात उघड झाले होते.
मध्यवर्ती पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांनी तपास करुन चार आरोपींना अटक करुन त्यांना संघटित गुन्हेगारी कायद्याचे कलम लावले होते. सरकार पक्षातर्फे आरोपींनीच हत्या केल्याचे न्यायालयात सांगण्यात आले. आरोपींचे वकील ॲड. पुनीत माहिमकर, ॲड. अनुराधा परदेशी, ॲड. माझी शेख यांनी सरकार पक्षातर्फे मांडलेले मुद्दे खोडून काढले आणि या प्रकरणाशी आरोपींचा काही संबंध नसल्याचे पुराव्यानिशी स्पष्ट केले. न्यायालयाने दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करताना गंभीर त्रृटी ठेवल्या. सबळ पुरावे न्यायालयासमोर दाखल केले नाहीत. त्यामुळे आरोपींची मोक्कातून निर्दोष मुक्तता करत असल्याचे आदेश न्यायालयाने दिले.
