ज्या दिवशी हे सरकार सत्तेत आले, शपथविधी झाला त्या दिवसापासून सरकार पडणार असल्याची अफवा पसरली होती. मात्र अजित पवार सत्तेत सामील झाल्यामुळे हे सरकार अधिक मजबूत झाले असून पक्षात कोणीही नाराज नसल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी स्पष्ट केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा पाठिशी असल्याने आपल्या सरकारला कोणताही धोका नसल्याचा दावाही त्यांनी केला.
अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना- भाजप सरकारमध्ये सामील झाल्यामुळे शिंदे गटात नाराज असल्याची चर्चा गेल्या दोन दिवसांपासून राजकीय वर्तुळात रंगली आहे. त्यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राजीनामा देणार असल्याच्या अफवाही पसरल्या. या पार्श्वभूमीवर शिंदे यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना सरकार मजबूत असल्याचे सांगितले. ज्या दिवसापासून या सरकारचा शपथविधी झाला त्या दिवसापासून सरकार पडणार या अफवा सुरू आहेत. आता तर या अफवांनी सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. पण या सरकारला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे पाठबळ आहे. त्यामुळे सरकारला कोणताहीधोका नसल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला.अजित पवारांनी विकासाला साथ दिली आहे. आमच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यांना बरोबर घ्यायचे ठरविले. गेल्या वर्षभरात झालेल्या विकासाला पाहून अजित पवार बरोबर आले आहेत. ते आल्याने सरकार मजबूत झाले असून शिवसेनेत कुणीही नाराज नाही. आम्ही बाळासाहेबांच्या विचारावर चालणारे लोक आहोत असे शिंदे यांनी स्पष्ट केले. ठाकरे गटाकडून आपल्यावर होणाऱ्या टीकेला उत्तर देताना, विरोधकांनी आधी आपल्या जळत्या घराकडे पाहावे, आत्मपरीक्षण करावे. गेल्या वर्षभरात जे काही चांगले निर्णय घेतले ते त्यांना बघवत नाही. पण लोकांना सगळे माहीत असून लोक पाहत आहेत, असा टोलाही त्यांनी ठाकरे यांना लगावला.
