मुंबई, ठाणे शहराला बुधवारी अतिमुसळधार पावसाचा अंदाज

मुंबई-ठाण्यात शनिवारी – रविवारी अधूनमधून विश्रांती घेत कोसळलेल्या पावसाने मंगळवारी सकाळपासून पुन्हा दमदार हजेरी लावली. दरम्यान, मुंबई आणि ठाणे परिसरात बुधवार, ५ जुलै रोजी अतिमुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

जून महिन्याच्या अखेरीस पावसाने दमदार हजेरी लावली. जुलै महिन्याच्या सुरुवातीच्या दिवसांत मुंबई आणि उपनगरांत पावसाचा लपंडाव सुरू होता. तर, नवी मुंबई आणि आसपासच्या भागांत मात्र मुसळधार पाऊस पडत होता. राज्यात जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात अनेक ठिकाणी पाऊस सुरू होता. मुंबई, पुणे येथे संपूर्ण आठवडाभर पावसाने मुक्काम केले होते. शहरांत अनेक ठिकाणी पाणी साचले आणि वाहतूक कोंडी झाली होती. दरम्यान, बुधवारी मुंबई आणि ठाणे परिसरात अतिमुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात मंगळवारी १८.२ मिलिमीटर, तर सांताक्रुझ केंद्रात ८.६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, रत्नागिरी, रायगड, तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यात ५ ते ८ जुलैदरम्यान अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच पुणे, कोल्हापूर आणि सातारा या जिल्ह्यांतही पुढील तीन ते चार दिवस अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. यामुळे जुलै महिन्याच्या सुरुवातील चांगला पाऊस पडेल, अशी माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. तर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांसह विदर्भातील बुलढाणा, अमरावती, अकोला, वाशिम, तसेच नागपूर, चंद्रपूर जिल्ह्यांत तुरळक पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *