मलनिस्सारण वाहिनीच्या ‘मॅनहोल’मध्ये सफाईचे काम करत असताना दोन कामगारांचा शनिवारी गोवंडी येथे मृत्यू झाला. रामकृष्ण (२५) आणि सुधीर दास (३०) अशी त्यांची नावे आहेत. याबाबत शिवाजी नगर पोलिसांनी संबंधित कंत्राटदारावर गुन्हा दाखल केला.
गोवंडी येथे शिवाजी नगर बस आगाराच्या बाजूला शनिवारी संध्याकाळी चार वाजता ही घटना घडली. याठिकाणी खासगी कंत्रादाराकडून येथील मलनिस्सारण वाहिनीची सफाई सुरू होती. यावेळी रामकृष्ण आणि सुधीर दास हे कामगार गटारात पडले. इतर कामगारांनी त्यांना बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.
गटारात लावण्यात आलेल्या पाण्याचा पंपाला स्पर्श झाल्यानंतर विजेच्या धक्क्याने त्यांचा मृत्यू झाला असावा, असा संशय पोलिसानी व्यक्त केला आहे. तर, याठिकाणी कुठल्याही प्रकारच्या सुरक्षा साधनांचा वापर केला नव्हता, असा आरोप सामाजिक कार्यकर्ता इरफान दिवटे यांनी केला आहे. दरम्यान, या सफाई कामगारांचा श्वास गुदमरून मृत्यू झाला असावा, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
