जूनदरम्यान राज्यात उष्माघाताचे २६०० रुग्ण, तर १२ जणांचा मृत्यू

 राज्यामध्ये यंदा मोठ्या प्रमाणात उकाडा वाढल्यामुळे उष्माघाताच्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. यंदा राज्यामध्ये मार्च ते जून या साडेतीन महिन्यांमध्ये उष्माघाताचे तब्बल २ हजार ६४९ संशयित रुग्ण आढळून आले आहेत. तर १२ जणांचा मृत्यू झाला आहे. उष्माघाताचे सर्वाधिक रुग्ण रायगड, वर्धा, नागपूर या जिल्ह्यांमध्ये आढळले आहेत, तर अहमदनगर, धुळे आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये रुग्णांची शून्य नोंद झाली आहे.

महाराष्ट्रात साधारणपणे मार्च ते मे महिन्यात उष्णतेच्या लाटा जाणवतात. विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि कोकण विभागातील काही जिल्हे प्रामुख्याने उष्णतेच्या लाटेमुळे प्रभावित होतात. १ मार्च ते ३१ जुलैदरम्यान उष्माघातामुळे आजारी पडणाऱ्या रुग्णांची प्रत्येक जिल्हा, नगरपालिका व महानगरपालिकांच्या आरोग्य विभागाकडून माहिती संकलित करण्यात येते. त्यानुसार महाराष्ट्रात दरवर्षी १ मार्च ते ३१ जुलैदरम्यान उष्णता विकार प्रतिबंध आणि नियंत्रणासाठी विविध पातळीवर उपाययोजना करण्यात येतात. यंदा मार्चच्या सुरुवातीपासून वाढत्या पाऱ्यामुळे नागरिक हैराण झाले होते. त्यातच जूनमध्ये पावसाला होत असलेल्या विलंबानेही उन्हाचा पारा चढाच राहिला आहे. त्यामुळे नागरिकांना दुपारी घरातून बाहेर पडणे मुश्किल झाले होते.

वाढत्या उष्णतेमुळे स्नायूंमध्ये गोळे येणे, चक्कर येणे, शरीराचे निर्जलीकरण होणे आणि उष्माघात आदी त्रास नागरिकांना होत आहे. वाढत्य उष्म्यामुळे यंदा नागरिकांना उष्माघाताचा त्रास अधिक झाल्याचे दिसून येत आहे. यंदा १ मार्च ते १९ जून या कालावधीमध्ये राज्यामध्ये तब्बल २ हजार ६४९ नागरिकांना उष्माघाताचा त्रास झाला आहे. रायगडमध्ये महाराष्ट्र भूषण कार्यक्रमाच्या वेळी झालेल्या दुर्लक्षामुळे सर्वाधिक ४१२ उष्माघाताचे संशयित रुग्ण आढळून आले आहेत. तर १२ जणांचा मृत्यू झाला. त्याखालोखाल वर्धा ३३४, नागपूर ३१७ आणि चंद्रपूरमध्ये १७७ रुग्ण आढळून आले आहेत. तर अहमदनगर, धुळे, सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यांमध्ये रुग्णांची शून्य नोंद झाली असून, गोंदिया, हिंगोली आणि कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी एका संशयित रुग्णाची नोंद झाली आहे. त्याचप्रमाणे पालघर (३), वाशिम (४), परभणी (४), सांगली (६), भंडारा (७) आणि रत्नागिरी (९) या जिल्ह्यांमध्ये उष्माघाताच्या संशयित रुग्णांची नोंद तुलनेत कमी झाली आहे.

उष्माघाताचा सर्वाधिक त्रास होणारे घटक

– ६५ वर्ष व त्यापेक्षा जास्त वय असणाऱ्या व्यक्ती

– १ वर्षाखालील व १ ते ५ वर्ष वयोगटातील मुले

– गरोदर माता

– मधुमेह, हृदयविकार तसेच अल्कोहोलीक व्यक्ती

– अतिउष्ण वातावरणामध्ये काम करण्याऱ्या व्यक्ती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *