अल्पवयीन मुलगी उकळीपेन (जि. वाशीम ) येथील तर, वर मुलगा मोहा ( ता. परळी जि. बीड ) चा आणि दोघांचा बालविवाह अंबाजोगाई (जि. बीड) येथे झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी दोघांच्या आईवडिलांसह वऱ्हाडी व इतरांवर अंबाजोगाई पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला.
बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई शहरातील भिमाईनगर परळी वेस येथे (उकळीपेन, ता.जि.वाशिम ) येथील एका अल्पवयीन मुलीचा विवाह गौतम तातेराव शिंदे (रा. मोहा, ता. परळी जि. बीड ) याच्यासोबत होत असल्याची माहिती बालविकास विभागाला मिळाली. त्यावरून बालविकास अधिकारी व पोलीस विवाहस्थळी गेले असता त्या ठिकाणी कोणीही मिळून आले नाही. अधिकारी व पोलिसांनी चौकशी केली असता सुरुवातीला माहिती देण्यास कोणीही पुढे आले नाही. समाज माध्यमातील निमंत्रण पत्रिकेनुसार शोध घेतला असता हा प्रकार खरा असल्याचे समोर आले. आज अंबाजोगाई तालुक्यात या प्रकरणात गुन्हा नोंद झाला आहे. जिल्हा, तहसील आणि गाव पातळीवर बाल विवाह रोखण्याच्या अनुषंगाने प्रशासनाने विविध समित्या गठीत केल्या असल्या तरी बालविवाह रोखण्यात आणि त्यासंदर्भात जनजागृती करण्यास या समित्यांना यश आलेले नाही.
