ओदिशामध्ये दि. २ जून रोजी झालेल्या भयावह रेल्वे अपघातातून देश सावरला नाही तोच रविवारी बिहारमधून एक अजस्र पूल कोसळल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. ओदिशामधील रेल्वे अपघातात जवळपास २७० हून अधिक प्रवाशी मृत्युमुखी पडले आहेत. तर हजारो लोक जखमी झाल्याचे वृत्त समोर येत आहे. त्यातच रविवारी बिहारमधील खगरियाच्या गंगा नदीवर असलेला मोठा पूल कोसळल्याचे समोर आले. अगुवानी-सुलतानगंज दरम्यान बांधलेल्या या पुलाचा काही भाग मागच्या वर्षी एप्रिल महिन्यातही कोसळला होता. त्या वेळी नितीन गडकरी यांनीदेखील पूल कोसळल्याची दखल घेतली. त्या वेळी त्यांच्या सेक्रेटरीने हवेमुळे सदर पूल कोसळल्याचे सांगितल्यावर गडकरी यांनी डोक्यावर हात मारला होता. फक्त हवेमुळे पूल कसा काय कोसळू शकतो? तिथे नक्कीच भ्रष्टाचार झाला असणार, असा अंदाज त्यांनी २०१९ सालीच व्यक्त केला होता.
रविवारी पूल कोसळल्यानंतर सत्ताधारी जनता दल युनायटेड व राष्ट्रीय जनता दल आघाडी आणि विरोधी पक्ष भाजपा यांच्या वाकयुद्ध सुरू झाले आहे. विरोधकांनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली. पण हा पूल कसा काय कोसळला? १७०० कोटी रुपये खर्च करून बांधण्यात आल्यानंतरही पूल कोसळण्याचे कारण काय? यासंबंधी घेतलेला हा आढावा.
वारा सुटल्यामुळे पूल कसा काय कोसळू शकतो?
भागलपूर आणि खगारिया जिल्ह्यांना जोडणारा अगुवानी-सुलतानगंज यांच्यादरम्यान गंगा नदीवर असणारा २०० मीटर लांबीचा पूल पत्त्याच्या घराप्रमाणे क्षणाधार्थ गंगेत विसर्जित झाला. सायंकाळी ६ वाजता काही स्थानिकांनी हा पूल कोसळत असल्याचे चित्रण आपल्या मोबाइलमध्ये केले आणि त्यानंतर काही क्षणात हा व्हिडीओ व्हायरल झाला. सोशल मीडियावर त्याची चर्चा सुरू झाली. सुदैवाने, पूल कोसळल्यामुळे कोणतीही जीवितहानी किंवा कुणालाही इजा झालेली नाही.
