आधी डोळ्यात चटणी टाकली, नंतर छातीवर वार; त्या कारणावरुन मेहुण्यानेच भाऊजीला संपवलं

बहिणीच्या चारित्र्यावर संशय घेतल्याने संतप्त झालेल्या भावाने आधी डोळ्यात मिरचीपूड टाकून आणि त्यानंतर छातीत चाकू भोसकून आपल्याच दाजीची हत्या केल्याची घटना किनवट तालुक्यातील धानोरा येथे घडली. ही घटना काल गुरुवारी रोजी दुपारी घडली. अंकुश माधव शेळके (वय २८, रा. पिंपरफोडी) असं मृताचं नाव आहे. घटना घडल्यानंतर काही तासातच किनवट पोलिसांनी आरोपी मेहुण्याला ताब्यात घेतलं आहे.

मयत अंकुश शेळके हा आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर नेहमी संशय घेत होता. संशयावरुन आपल्या पत्नीसोबत वाद घालून मारहाण करायचा. या त्रासाला कंटाळून मयताची पत्नी धानोरा येथे आपल्या माहेरी राहायला गेली आणि भाऊ राजू वानोळे याला त्रासाबद्दल माहिती दिली. पत्नी नांदायला येत नसल्याने अंकुश शेळके हा मंगळवारी धानोरा आपल्या सासरवाडीत गेला. त्याने आपल्या पत्नीची समजूत काढली आणि त्यानंतर पत्नी देखील पतीसोबत जाण्यास तयार झाली.

थोड्याच वेळात अंकुश शेळकेचा मेहुणा राजू वानोळे हा तेथे आला आणि बहिणीच्या चारित्र्यावर संशय का घेतो? म्हणून त्याने अंकुश शेळकेसोबत वाद घालायला सुरुवात केली. या वादात आरोपी मेहुण्याने अंकुश शेळके याच्या डोळ्यात आधी मिरची पावडर टाकली त्यानंतर छातीत चाकू भोसकला. या घटनेत अंकुश हा रक्तबंबाळ झाला होता. अशा स्थितीत अंकुश हा स्वतःचा जीव वाचवण्यासाठी गावातील रस्त्यावर धावू लागला.

मात्र, शरीरातून अतिरक्तस्त्राव झाल्याने त्याचा मृत्यू झाला. या घटनेनं गावात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी विजय डोंगरे, पोलीस निरीक्षक दीपक बोरसे आणि त्यांच्या टीमने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. घटनेच्या काही तासातच पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले. या प्रकरणी किनवट पोलिसांनी आरोपी विरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *