कपडे धुण्यासाठी परिवारासह गेलेल्या बारा वर्षीय बालकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यात सोमवारी चार वाजताच्या सुमारास घडली. आईच्या डोळ्या देखतच अवघ्या बारा वर्षीय बालकाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
दारणा नदी काठ परिसरात महिला नेहमीच कपडे धुण्यासाठी गर्दी करत असतात. दोन दिवसांपूर्वीच मुकणे धरणाचे आवर्तन सोडण्यात आले आहे, त्यामुळे नदी तुडुंब भरुन वाहत होती. घरातील कपडे धुण्यासाठी नाठे कुटुंब देखील त्या ठिकाणी गेले होते. कपड्यांल्यानंतर गाडीही धुण्यात आली. यावेळी कडक उन्हामुळे नदीत आंघोळ करण्याचा मोह आदित्यला आवरता आला नाही.आंघोळ करीत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने आदित्य नदीत बुडू लागला. त्याच्यासोबत असलेल्या चुलत भावांनी त्याला पाहिले. त्यांनी घरच्यांना आवाज दिला, तेव्हा आदित्य गटांगळ्या खात होता. आईने खूप आरडाओरडा केला मात्र त्याठिकाणी कोणीही उपस्थित नव्हते. डोळ्यांदेखत मुलगा नदीत बुडत असल्याचे पाहून आईने मोठ्याने हंबरडा फोडला. मात्र पाण्याच्या प्रवाहात आदित्य खोलवर बुडाला होता. दुर्दैवी आईच्या डोळ्यांसमोरच पोटच्या मुलाचा पाण्यात बुडून अंत झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
