उशिराने का होईना अखेर ठाणे जिल्ह्यातील शहरांना घरगुती आणि औद्योगिक वापरासाठी पाणीपुरवठा करणाऱ्या एमआयडीसी प्रशासनाने १५ दिवसांतून एक दिवस पाणीकपात करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या शुक्रवारपासून पाणीकपात लागू केली जाणार होती. परंतु, मंगळवारी काटई इथे जलवाहिनी फुटून पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याने पुढील आठवड्यात पाणीकपातीची अंमलबजावणी होईल, अशी माहिती एमआयडीसीच्या संबंधित अधिकाऱ्यांनी दिली. कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात यापूर्वीच पाणीकपात लागू झाली आहे. २०२० ते २०२२ अशी सलग तीन वर्षे ठाणे जिल्ह्यात पाणीकपात करावी लागली नाही. ती परंपरा चौथ्या वर्षी मात्र खंडित झाली आहे.
यंदा नगरविकास विभागाने राज्यातील महापालिका आणि नगरपालिकांनी उपलब्ध पाणीसाठ्यानुसार पाणीकपातीचा निर्णय घ्यावा, असे आदेश मार्च महिन्यात दिले होते. त्यानुसार कल्याण-डोंबिवली महापालिकेने आठवड्यातून एकदा पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. नवी मुंबई महापालिकेनेही पाणीकपात लागू केली.
ठाणे जिल्ह्यात सर्वांत जास्त पाणीपुरवठा एमआयडीसीमार्फत केला जातो. ठाणे जिल्ह्यातील औद्योगिक वसाहती आणि शहरांना घरगुती वापरासाठी एमआयडीसी दररोज ९०४ दक्षलक्ष लिटर पाणीपुरवठा करते. कल्याण-डोंबिवली महापालिका ३६० दशलक्ष लिटर, स्टेम प्राधिकरण- ३१६ दशलक्ष लिटर तर महाराष्ट्र जीवन प्राधिकरण १४० दशलक्ष लिटर पाणी पुरवठा करते. बारवी धरणातून दररोज १२०० दशलक्ष लिटर पाणी सोडले जाते. आंद्रा धरणातून भिवपुरीच्या टाटा विद्युत प्रकल्पाद्वारे ८०० दशलक्ष लिटर पाणी उल्हास नदीत सोडले जाते.
