मूकबधिर मातापित्याच्या मुलाचे स्पर्धा परिक्षेत धवल यश

तोंडातून एक अक्षरही न काढणारे आणि कधी हट्ट करावा म्हटलं तर ऐकूही न येणारे मायबाप. अशा मूकबधीर आईबापाच्या पोटी जन्म झालेल्या कळंबी ता. मिरज येथील तरूणांने पहिल्याच प्रयत्नात राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होउन जलसिंचन विभागातील सहायक अभियंता पदाला गवसणी घातली.

कळंबी येथील शैलेश चवगोंडा पाटील (वय २८) या तरूणांने राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षेत चांगले यश पटकावत राज्यात 48 वा क्रमांक पटकावला. या तरूणाचे वडिल चवगोंडा पाटील हे मूकबधीर. पण मिरजेच्या मूकबधीर शाळेत कसे तरी चौथीपर्यंत शिकलेले. अक्षर ओळख आणि किरकोळ आकडेमोड करता येत होती. मात्र मूकबधीर असल्याने लग्नही एका मूकबधीर महिलेशी झालेले. तिचे नाव ललिता. रोजचा संपर्क केवळ खाणाखुणा करूनच.

मूकबधीर असलेले चवगोंडा कधी दूध डेअरीत तर कधी रानात शेतमजूर म्हणून कामाला जात होते. घरची शेती केवळ एक एकर. त्यात कसा बसा संसाराचा गाडा हाकत असताना मूकबधीर असलेल्या ललिता यांनी शिलाई काम करीत तेलामिठाला हातभार लावलेला. अशा कौटुंबिक स्थितीत मुलगा शैलेश यांने जिद्दीने अभियांत्रिकी पदवी घेउन स्पर्धा परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. यासाठी महागडी शिकवणी घेणे परवडणारे नव्हते. मिरजेतच एखाद्या ग्रंथालयात बसून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करीत राज्य सेवा लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली. आणि यात तो पहिल्याच प्रयत्नात यशस्वी ठरला.

गावातील मूकबधीर आईवडिलाचा मुलगा एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाल्याचा अख्ख्या गावाला आनंद झाला. प्रतिकूल परिस्थितीत धवल यश संपादन केल्याबद्दल शैलेश याचा गावाच्यावतीने सत्कार करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रा. प्रमोद इनामदार, पंचायत समितीच्या माजी सभापती माणिकताई माळी, माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक दादासाहेब पाटील, पोलीस पाटील मन्सूर नदाफ आदींनी या तरूणाचे कौतुक करीत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *