महाराष्ट्र मॅरिटाईम बोर्डाने (एम.एम.बी) सागरी जीवांची उत्पत्ती वाढवण्यासाठी, तसेच जैवविविधतेचे संरक्षण आणि संवर्धन करण्याच्या हेतूने अक्सा समुद्रकिनाऱ्यावर समुद्र भिंत बांधली आहे. मात्र या समुद्र भिंतीविरोधात पर्यावरणतज्ज्ञांनी राष्ट्रीय हरित लवादाकडे धाव घेतली आहे.
अक्सा किनाऱ्यावर बांधण्यात आलेल्या समुद्रभिंतीला पर्यावरणतज्ज्ञांनी यापूर्वीच विरोध केला होता. मढमधील अक्सा समुद्रकिनारा सीआरझेड अधिसूचना, २०११ अंतर्गत सी.आर.झेड १ क्षेत्राच्या श्रेणीत येतो. दरम्यान, एसीझेडएमएने ११५ व्या बैठकीत समुद्रकिनाऱ्यावरील भक्कम बांधकामामुळे समुद्रकिनाऱ्याचा ऱ्हास होऊ शकतो, तसेच सीआरझेड अधिसूचना २०११ नुसार भक्कम बांधकामास परवानगी नाही, असे प्राधिकरणाने निवेदनात म्हटले आहे. यानंतर झालेल्या बैठकांमध्ये एमएमबीने समुद्रकिनाऱ्याचे सुशोभिकरण करण्यासाठी विविध प्रस्ताव मांडले होते. त्यामुळे आंतरप्रवाही (इंटरटाइडल) आणि सीआरझेड १ भागात कायमस्वरूपी काँक्रिटच्या बांधकामांना पर्यावरणतज्ज्ञांनी विरोध केला होता.दरम्यान, एमएमबीमार्फत वाळू उपसण्यात येत असल्याची, समुद्रकिनारा सपाट करण्यात येत असल्याची आणि अक्सा बीचच्या विस्तीर्ण भागाचे काँक्रिटीकरण करून बंधारा बांधण्यात येत असल्याची बाब लक्षात येताच पर्यावरणतज्ज्ञांनी तेथे नियमांचे उल्लंघन होत असल्याची तक्रार मुख्यमंत्री आणि एमओईएफसीसीकडे केली. या प्रकरणाची दखल घेण्याचे निर्देश मुख्यमंत्रीनी पर्यावरण विभागाच्या मुख्य सचिवांना दिले होते. परंतु याप्रकरणाकडे दुर्लक्ष झाले. दरम्यानच्या काळात एमएमबीने समुद्रकिनाऱ्याच्या मधोमध सुमारे ६०० मीटर आणि चार मीटर रूंदीच्या काँक्रिट रस्त्याचे बांधकाम पूर्ण केले, असे पर्यावरणतज्ज्ञ बी. एन. कुमार यांनी लवादाकडे केलेल्या याचिकेत म्हटले आहे. भिंत आणि रस्त्यामुळे भविष्यात समुद्रकिनारा पूर्णपणे नष्ट होईल, अशी भिती पर्यावरण अभ्यासक झोरू बथेना यांनी व्यक्त केली आहे.
