भांडुपमधील महानगरपालिकेच्या कार्यालयात मनसेचे आंदोलन

भेटण्यासाठी आगाऊ वेळ दिल्यानंतरही अधिकारी कार्यालयातून बाहेर निघून गेल्यामुळे संतप्त झालेल्या मनसेच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी गुरुवारी मुंबई महानगरपालिकेच्या एस विभाग कार्यालयात आंदोलन केले. यावेळी कार्यकर्त्यानी कार्यालयातील खुर्च्यांची तोडफोड करीत अधिकाऱ्यांचा निषेध केला.

भांडुपमध्ये काही महिन्यांपासून नागरिकांना अनेक समस्या भेडसावत आहेत. अनेक ठिकाणी लावलेल्या मनसेचे झेंड्यांवर महानगरपालिकेकडून कारवाई करण्यात येत आहे. यासंदर्भात परिसरातील मनसेच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यानी चर्चा करण्यासाठी महानगरपालिका अधिकाऱ्यांची वेळ घेऊन त्यांना भेटण्याचा प्रयत्न केला. मात्र संबंधित अधिकारी भेटण्यास टाळाटाळ करीत असल्याचा आरोप मनसेकडून करण्यात आला आहे.

अखेर गुरुवारी मनसेच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांना येथील अधिकाऱ्यांनी भेटण्यासाठी वेळ दिली. त्यानुसार मनसेचे पदाधिकारी, कार्यकर्ते एस विभाग कार्यालयात आले होते. मात्र बराच वेळ होऊन गेल्यानंतरही अधिकाऱ्यांची भेट झाली नाही. चौकशी केली असता अधिकारी कार्यालयातच नसल्याचे त्यांना समजले. त्यामुळे संतापलेल्या पदाधिकारी, कार्यकर्त्यानी महानगरपालिकेच्या कार्यालयात जोरदार आंदोलन केले. काही कार्यकर्त्यांनी कार्यालयातील काही खुर्च्याची तोडफोडही केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *