करोनाकाळात म्हणजेच २०२० मध्ये कामासाठी बाहेर गेलेल्या एका देहविक्रय करणाऱ्या महिलेच्या चार वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपाप्रकरणी विशेष न्यायालयाने ३८ वर्षांच्या आरोपीला मरेपर्यंतच्या कारावासाची शिक्षा सुनावली. देहविक्रय करणाऱ्या महिलांच्या मुलांचे बालपणही मौल्यवान आहे आणि त्यांनाही सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे हा संदेश समाजात जाणे गरजेचे आहे, अशी टिप्पणीही बालकांवरील लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत (पोक्सो) न्यायालयाने आरोपीला मरेपर्यंतच्या कारावासाची शिक्षा सुनावताना केली.
विशेष न्यायालयाने आरोपीला एक लाख रुपयांचा दंड ठोठावला. तसेच त्यातील ५० टक्के रक्कम संबंधित मुलीला भरपाई देण्याचे आदेश दिले. पीडित मुलगी पुनर्वसनासाठी जिल्हा विधि सेवा प्राधिकरणाद्वारे नुकसानभरपाई योजनेंतर्गत भरपाई मिळण्यासही पात्र आहे, असेही विशेष न्यायालयाने स्पष्ट केले. आरोपीला स्वत:ला तीन मुले आहेत. असे असूनही इतर मुलांबद्दल तो संवेदनशील नाही, असे या प्रकरणातून दिसून येते. स्वत:च्या लालसेपुढे मूल व स्त्री यांच्यातील फरक आरोपी विसरला. म्हणूनच त्याला शिक्षेत कोणतीही दया दाखवता येणार नाही, असे न्यायालयाने सांगितले.
