व्यावसायिकाच्या घरातून दोन कोटींचे दागिने चोरीला, नोकराविरोधात गुन्हा दाखल

 गावदेवी येथील कारमायकल रस्ता परिसरात राहणाऱ्या व्यावसायिकाच्या घरातून सुमारे दोन कोटी रुपयांचे दागिने चोरीला गेले असून याप्रकरणी गावदेवी पोलीस ठाण्यात नोकराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.

व्यावसायिक शरदकुमार शाम सांगी हे कारमायकल रस्ता येथे राहतात. त्यांच्या घरातील तिजोरीतून महागडे घड्याळ, हिऱ्यांचा हार, हिऱ्यांची कर्णफुले, हिरे जडीत ब्रेसलेट, सोन्याचा हार, साखळी व कर्णफुले तसेच काळ्या-पांढऱ्या रंगाच्या हिऱ्यांचा हार असे सुमारे एक कोटी ९८ लाख रुपयांचे दागिने गायब असल्याचे निष्पन्न झाले. सांगी यांनी केलेल्या तक्रारीवरून गावदेवी पोलिसांनी नोकर मायलेन सुरेन (३७) याच्याविरोधात चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.

तक्रारीनुसार २२ मार्च ते १४ एप्रिलच्या दरम्यान चोरी झाल्याचे म्हटले आहे. याबाबत माहिती देताना अधिकाऱ्याने सांगितले, तिजोरीतून एकूण आठ महागडे दागिने चोरीला गेले आहेत. प्रत्येक दागिने सुमारे २० लाख ते ६० लाख रुपये किमतीचा आहे. तिजोरीत दागिने असल्याची माहिती नोकराला होती. याप्रकरणी अधिक तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *