मुंबईतल्या राष्ट्रीय ग्राहक विवाद निवारण आयोगाने (एनसीडीआरसी) १५ वर्ष जुन्या खटल्याप्रकरणी याचिकाकर्त्याला दिलासा देणारा निर्णय जाहीर केला आहे. एनेस्थेटिक्सच्या (भूल देण्याचं औषध) ओव्हरडोसमुळे महिलेचा मृत्यू झाल्याचं हे प्रकरण होतं. २००८ पासून सुरू असलेल्या या खटल्याप्रकरणी ग्राहक आयोगाने रुग्णालयाला १२ लाखांचा दंड ठोठावला आहे.
हे प्रकरण मुंबईच्या परळ रुग्णालयातील आहे. वृत्तानुसार कुसूम मेमाने नावाच्या महिलेला हाड मोडल्यामुळे २० जून २००८ रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. दुसऱ्या दिवशी तिथले डॉक्टर अजय राठोड यांनी कुसूम यांच्यावर शस्त्रक्रिया केली. परंतु शस्त्रक्रियेपूर्वी देण्यात आलेल्या अॅनेस्थेशियामुळे कुसूम शुद्धीवर आल्या नाहीत. त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी सुनावणी करताना एनसीडीआरसीने रुग्णालय आणि डॉक्टरांवर व्याजासह १२ लाखांहून अधिक दंड ठोठावला आहे.
कुसूम यांची मुलगी उमा निकम यांनी सांगितलं की, आई शुद्धीवर न आल्याने तिला दुसऱ्या रुग्णालयात नेण्यात आलं. तिथे चार महिन्यांनी २४ ऑक्टोबर २००८ रोजी आईचा मृत्यू झाला. उमा यांनी सांगितलं की, त्यांनी मुंबईच्या डिस्ट्रिक्ट फोरमकडे याप्रकरणी कारवाईची मागणी केली. परंतु तिथे उमा यांची तक्रार फेटाळण्यात आली. २०१५ मध्ये त्या राज्य ग्राहक आयोगाकडे गेल्या. आयोगाने २०१८ मध्ये उमा यांना याप्रकरणी दिलासा दिला होता, तसेच रुग्णालयाला उमा यांना नुकसान भरपाई देण्यास सांगितलं. परंतु रुग्णालय आणि डॉक्टरांनी २०१९ मध्ये राष्ट्रीय ग्राहक आयोगाकडे धाव घेतली.
रुग्णालयाच्या निष्काळजीपणावर बोट
त्यानंतर हे प्रकरण एसीडीआरसीकडे पोहोचलं. यावर नुकतीच NCDRC ने सुनावणी करत रुग्णालयाच्या निष्काळजीपणावर बोट ठेवलं असून त्यांना दंड भरण्यास सांगितलं आहे. आयोगाने म्हटलं आहे की, अॅनेस्थेशिया देणाऱ्या डॉक्टरांचा निष्काळजीपणा दिसून येत आहे. डॉक्टर मुलजी गडा यांनी कुसूम यांना अॅनेस्थेशिया दिला होता. डॉ. गडा यांचं अलिकडेच निधन झालं आहे.
आयोगाने म्हटलं आहे की, डॉक्टर गडा यांनी अॅनेस्थेशिया देण्यापूर्वी रुग्णाची योग्य तपासणी केली नव्हती. गडा यांनी केवळ डॉक्टर राठोड यांच्याशी फोनवर बोलून रुग्णाच्या आरोग्याची माहिती घेतली होती. आता आयोगाने रुग्णालय आणि डॉक्टरांना दंड भरण्याचे आदेश दिले आहेत.
