मुंबई महानगरपालिकेच्या विभाग कार्यालयाने कुर्ला परिसरातील प्रदुषण करणाऱ्या कारखान्यांवर मंगळवारपासून कारवाई सुरू केली असून भंगार अल्युमिनियम जाळणाऱ्या व परिसरात धूर निर्माण करणाऱ्या २०-२२ कारखान्यांवर विभाग कार्यालयाने ४८ तासांची नोटीस बजावली होती. ही मुदत संपल्यानंतर विभाग कार्यालयाने पोलीस बंदोबस्तात संबंधित कारखान्यांवर कारवाई सुरू केली.
मुंबई महानगरपालिकेने प्रदुषणाला आळा घालण्यासाठी नुकताच एक कृती आराखडा तयार केला आहे. या आराखड्यानुसार प्रदुषणास कारणीभूत असणाऱ्या उद्योगांवर नियंत्रण आणण्यासाठी कारवाई करण्यात येणार आहे. याअंतर्गत कुर्ला परिसरातील अनधिकृत कारखान्यांवर गेल्या आठवड्यात ४८ तासांची नोटीस बजावण्यात आली होती. खैरानी रोड, साकिनाका परिसरातील या कारखान्यांवर नोटीस बजावण्यात आली होती. या कारखान्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर अल्युमिनियम, तर काही ठिकाणी कचरा जाळण्यात येतो. त्यासाठी भट्टीमध्ये मोठ्या प्रमाणावर लाकूड जाळण्यात येते. या भट्टीतून निघणारा धूर बाहेर जाण्यासाठी धुरांडी बसवलेली आहेत. त्यातून मोठ्या प्रमाणावर धूर वातावरणात सोडण्यात येतो. त्यामुळे या परिसरात मोठ्या प्रमाणावर प्रदुषण होत असून मुंबई महानगरपालिकेच्या ‘एल’ विभागाने संबंधित कारखान्यांवर ४८ तासांची नोटीस बजावली होती. ही मुदत संपताच ‘एल’ विभाग कार्यालयाने मंगळवारपासून कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केली. आणखी काही दिवस पोलीस बंदोबस्तामध्ये ही कारवाई सुरू राहणार असल्याची माहिती ‘एल’ विभागाचे सहाय्यक आयुक्त महादेव शिंदे यांनी दिली.
या परिसरात मोठ्या प्रमाणावर अनधिकृत भंगाराची दुकाने, कारखाने, गोदामे आहेत. यापैकी काही दुकानांमध्ये भंगारातील धातूच्या वस्तू जाळून, वितळवून त्याचे छोटे चौकोनी तुकडे तयार करण्यात येतात. महानगरपालिकेच्या पथकाने मंगळवारी केलेल्या कारवाईदरम्यान काही कारखान्यांमधून गॅस सिलिंडर जप्त करण्यात आले, तर काही कारखान्यांमधील भट्ट्या तोडून टाकल्या. तसेच कारखान्यातील अन्य सामानही जप्त करण्यात आले. त्याचबरोबर कारखान्यांचा वीज व पाणीपुरवठा खंडीत करण्यात आल्याची माहिती शिंदे यांनी दिली.
