मुंबईकरांसाठी मोठी बातमी! Corona रुग्णांची संख्या वाढली, मुंबईत पुन्हा एकदा मास्कसक्ती

देशातील विविध राज्यांमध्ये कोविड-19 (Covid-19) विषाणू संसर्गाने पुन्हा एकदा डोके वर काढले असून बृहन्मुंबई महानगरपालिका (Mumbai) क्षेत्रात देखील मागील काही दिवसांमध्ये रुग्णसंख्या वाढली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या अंदाजानुसार मे महिन्यामध्ये कोविड संसर्ग बाधितांची संख्या वाढण्याची शक्यता असून या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेची सर्व रुग्णालये, तसंच सर्व खासगी रुग्णालयांनी (Mandatory Masks in Hospitals) देखील कोविड उपचारांसाठी सुसज्ज रहावे, अशी सूचना बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल (Iqbal Singh Chahal) यांनी केली आहे. विशेषतः 60 वर्षे वयावरील ज्येष्ठ नागरिकांना सक्ती नसली तरी त्यांनी गर्दीच्या ठिकाणी वावरताना खबरदारीचा उपाय म्हणून मास्क लावणे आवश्यक (Mask Mandetory) आहे. मात्र महानगरपालिकेच्या सर्व रुग्णालयांमध्ये सर्व कर्मचारी, रूग्ण तसंच येणाऱ्या नागरिकांना यापुढे मास्क लावणे सक्तीचे असेल, असेही  चहल यांनी निर्देश दिले आहेत.

कोविडच्या वाढत्या रूग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील आरोग्य व्यवस्थेच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल यांनी आज तातडीची आढावा बैठक घेतली. या बैठकीस अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे)  आश्विनी भिडे, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) आशीष शर्मा, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प)  पी. वेलरासू, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. संजीव कुमार यांच्यासह सर्व संबंधित सहआयुक्त, उपआयुक्त, सहायक आयुक्त तसंच खातेप्रमुख उपस्थित होते.

यावेळी महानगरपालिका आयुक्त चहल म्हणाले की, केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाने कोविड रूग्णसंख्या वाढीबाबतचा वर्तवलेला अंदाज पाहता संपूर्ण यंत्रणेने सज्ज राहण्याचा सल्ला सरकारने दिला आहे. सक्ती नसली तरी काही मार्गदर्शके खबरदारीचा उपाय म्हणून निर्गमित करावयाची आहेत. वैद्यकीय अंदाजानुसार येत्या मे महिन्यामध्ये कोविड संसर्गाच्या रूग्णांची संख्या वाढण्याचा अंदाज आहे. त्यामुळे, मुंबईतील महानगरपालिकेच्या सोबतच खासगी रुग्णालयांच्या ठिकाणीही रूग्णशय्या सज्ज ठेवणे आवश्यक आहे, असे सांगून आयुक्तांनी विविध सूचना याप्रसंगी केल्या.

1. औषध इत्यादी खरेदी- महानगरपालिकेच्या मध्यवर्ती खरेदी खात्याने महानगरपालिकेची सर्व रुग्णालये मिळून आवश्यक असणारे ग्लोव्हज्, मास्क, पीपीई कीट्स त्याचप्रमाणे औषधसाठा व इतर वैद्यकीय सामुग्री यांचा आढावा घेवून त्यांची आवश्यकता असल्यास खरेदीची प्रक्रिया सुरु करावी, कोणत्याही बाबीचा तुटवडा भासणार नाही, याची खातरजमा करण्यात यावी.

2. कोविड चाचण्या- कोविड संसर्ग बाधित रूग्ण वेळीच शोधून काढले तर संसर्गाला अटकाव करता येतो, त्यामुळे कोविड चाचण्यांची संख्या वाढवावी, परिणामी उपचार करणे सोपे जाते. चाचण्यांची संख्या वाढवतानाच खासगी प्रयोगशाळा संचालकांची अतिरिक्त आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी लवकरात लवकर बैठक घ्यावी.

3. वैद्यकीय प्राणवायू- कोविड रुग्णसंख्या वाढल्यास अतिदक्षता उपचारांची आवश्यकता वाढू शकते. हे लक्षात घेवून सर्व रूग्णालयांच्या ठिकाणी असलेले वैद्यकीय प्राणवायू निर्मिती (ऑक्सिजन प्लांट) सुस्थितीत कार्यरत आहेत, ऑक्सिजनची मागणी व पुरवठा यांचा ताळमेळ आहे, या सर्व बाबींचे परीक्षण (ऑडिट) रुग्णालयांनी करावे.

4. विभागीय नियंत्रण कक्ष (वॉर्ड वॉर रूम) – कोविडच्या यापूर्वीच्या लाटांमध्ये रूग्ण व्यवस्थापनात महत्त्वाची भूमिका पार पाडणारे सर्व विभागीय नियंत्रण कक्ष (वॉर्ड वॉर रुम) यांच्या कामकाजाचा तातडीने फेरआढावा घ्यावा आणि कोणत्याही प्रकारच्या स्थितीचा सामना करण्यासाठी आवश्यक ते सर्व मनुष्यबळ, यंत्रणेसह ते कार्यरत राहतील, याची दक्षता घ्यावी. नागरिकांना कोविड काळात तत्काळ प्रतिसाद मिळतानाच आवश्यक असलेली मदत देण्यासाठी विभागीय नियंत्रण कक्षाची जबाबदारी महत्वाची असेल.

5. कोविड रुग्णांची संख्या कमी करणे यासाठी कोविड जागरुकता महत्त्वाची असल्याने जनजागृतीवर भर द्यावा.

6. कोविडच्या वाढत्या रुग्णसंख्येमध्ये 60 वर्षे वयावरील ज्येष्ठ नागरिकांना अधिक धोका असल्याचे निदर्शनास येत आहे. यामुळे बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रामधील 60 वर्षेपेक्षा अधिक वयाच्या सर्व ज्येष्ठ नागरिकांनी, त्याचप्रमाणे सहव्याधी असलेल्या नागरिकांनी मास्कचा सातत्याने उपयोग करणे हे त्यांच्यासाठी सुरक्षित ठरेल. त्यांना मास्कची सक्ती नसली तरी खबरदारी घेणे हे अधिक योग्य आहे. शक्यतो, सार्वजनिक व गर्दीच्या ठिकाणी मास्कचा वापर करावा. त्याबाबतची सूचना आरोग्य विभागाकडून तातडीने प्रसारित करण्यात यावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *