मीठ हा मानवाच्या आहारातील अविभाज्य घटक आहे, मात्र, या मिठाचा आहारातील अतिरेक कित्येक आजारांना निमंत्रण देणारा असून मिठाचे अतिरिक्त सेवन टाळल्यास २०३० पर्यंत जगातील ७० लाख जीव वाचवणे शक्य असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने स्पष्ट केले आहे.
सोडियम नियंत्रण कसे करावे?
- नियंत्रित मीठ असलेल्या पदार्थ सेवनाला प्रोत्साहन देणे.
- सार्वजनिक संस्थांतील आहारातील मीठ नियंत्रणासाठी धोरण निश्चित करणे.
- अतिरिक्त मीठ आणि दुष्परिणाम यांबाबत जनजागृती करणे.
आहारात किती मीठ योग्य?
दररोज पाच ग्रॅमपेक्षा कमी मिठाचे सेवन हे प्रकृतीसाठी योग्य असल्याचे जागतिक आरोग्य संघटना सांगते. प्रत्यक्षात हे प्रमाण दररोज १०.८ ग्रॅम एवढे आहे. अतिरिक्त मिठाचे सेवन हे कित्येक असंसर्गजन्य आजारांना निमंत्रण देते. यांमध्ये लठ्ठपणा, कर्करोग, अस्थिरोग, मूत्रपिंडाचे विकार यांचा धोका समाविष्ट आहे. आहारातील मिठाचा अतिरेक टाळण्यासाठी प्रक्रिया केलेले पाकीटबंद पदार्थ खाऊ नयेत. पाकीटबंद पदार्थ खाणे अनिवार्य असेल त्या वेळी त्यावर छापलेली पोषण मूल्य विषयक माहिती तपासून त्यात अतिरिक्त मीठ नाही, याची खात्री करा. स्वयंपाक करताना वापरलेल्या मिठापेक्षा जास्त मीठ जेवताना वरून वाढून घेऊ नये. फळे, सॅलड खाताना त्यांवर मीठ घेणे बंद करावे, असे आहारतज्ज्ञ सांगतात.
