मानखुर्द-ठाणे प्रवास लवकरच वेगवान, छेडानगरमधील उड्डाणपुलाचे काम पूर्ण

छेडानगर येथील १ हजार २३५ मीटर लांबीच्या उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर या पुलाचे उदघाटन करण्याचा मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचा (एमएमआरडीए) मानस आहे. हा पूल वाहतुकीस खुला झाल्यानंतर छेडानगर जंक्शन भागातील वाहतूक कोंडीची समस्या सुटणार असून  मानखुर्द – ठाणे प्रवास अधिक वेगाने होणार आहे.

 पूर्वमुक्त मार्गावरून विनाअडथळा येणाऱ्या वाहनांना छेडानगर जंक्शनमध्ये वाहतूक कोंडीत अडकावे लागते. त्यामुळे एमएमआरडीएने छेडा नगर वाहतूक सुधार प्रकल्प हाती घेतला. या प्रकल्पाअंतर्गत छेडा नगर येथे तीन उड्डाणपूल आणि एक सब-वे बांधण्यात येत आहेत. यापैकी पहिला तीन मार्गिकांचा पूल ६८० मीटर लांबीचा असून तो शीव आणि ठाण्याला जोडणाऱ्या मार्गावर आहे. दुसरा दोन मार्गिकांचा १ हजार २३५ मीटर लांबीचा उड्डाणपूल मानखुर्द आणि ठाण्याला जोडणाऱ्या मार्गावर आहे. तर, तिसरा ६३८ मीटर लांबीचा छेडा नगर उड्डाणपूल सांताक्रुझ-चेंबूर जोडरस्त्याला जोडण्यात आला आहे. यासाठी २४९.२९ कोटी रुपये खर्च करण्यात येत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *