भिवंडी आज पहाटे दोन मजली इमारत कोसळून मोठी दुर्घटना घडली. या दुर्घटनेत एका ३७ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तर एका व्यक्तीला वाचवण्यात यश आलं आहे. ही व्यावसायिक इमारत होती. आज पहाटे ३.३० वाजेच्या सुमारास भिवंडीतील खाडीपार भागात ही घटना घडली, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
ग्राउंड प्लस २ म्हणजे तळमजल्यासह वर दोन मजल्याची ही इमारत होती. या इमारतीच्या तळमजल्यात ७ दुकानं होती. वरच्या मजल्यांवर व्यावसायिक आस्थापने होती. इमारत कोसळताच अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी बचावकार्य सुरू केले, अशी माहिती निझामपुरा पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी दिली.
इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत माजिद अन्सारी या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. इमारत कोसळली त्यावेळी माजिद हा झोपलेला होता आणि इमारतीच्या ढिगाऱ्याखाली दबून त्याचा मृत्यू झाला, अशी माहिती पोलिसांनी दिली. तर ढिगाऱ्या खाली अडकलेल्या एका व्यक्तीला वाचवण्यात यश आला. त्याला कुठलीही दुखापत झाली नसल्याचं अग्निशमन दलाच्या सुत्रांनी सांगितलं.
कोसळलेली इमारत ही किती जुनी होती आणि कुठल्या स्थितीत होती, याची अधिक माहिती मिळू शकली नाही. या प्रकरणी अपघाती मृत्युची नोंद करण्यात आली आहे. मृत्यू झालेल्या व्यक्तीचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं.
