मुंबईतील वांद्रे परिसरात बेस्टच्या एका बसला अचानक आग लागली. या आगीत बस पूर्णपणे जळून खाक झाली आहे. दरम्यान, बसमधील सर्व प्रवासी सुरक्षित आहेत. त्यांना कोणताही धोका पोहोचला नाही.
वांद्रे परिसरात बेस्ट बसला आग लागल्याची घटना समोर आली. एकाने बसमधून स्पार्क होत असल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांने प्रसंगसावधाने सगळ्यांचे लक्ष वेधले. त्यानंतर आग लागली तेव्हा सगळ्या प्रवाशांना बसमधून बाहेर काढण्यात आले. सुदैवाने सारे प्रवासी सुखरुप आहेत. दरम्यान अग्निशमन दल वेळीच घटनास्थळी दाखल होत त्यांनी आग विझवण्यासाठी प्रयत्न सुरु केले. आगीनंतर बसचा सांगाडा शिल्लक राहिला. या दृघटनेत बेस्टचे मोठे नुकसान झाले.
नवी मुंबईतही बसला आग
दरम्यान, आठवड्यापूर्वीही नवी मुंबई महापालिका परिवहन विभागाच्या बसला खोणी-तळोजा रस्त्यावरील नागझरी बस थांब्याजवळ अचानक आग लागली. चालकाने प्रसंगावधान राखून प्रवाशांना वेळीच सावध केल्याने जीवित हानी टळली. बस आगीत खाक झाली आहे. शार्टसर्किटमुळे आग लागली असण्याचा संशय अग्निशमन दलाच्या जवानांनी व्यक्त केला.
त्याआधीही नवी मुंबईत स्कूल बसला आग लागली होती. शाळकरी मुलांना शाळेत सोडताना स्कूल बसला आग लागली. खारघरमध्ये घरकुल सेक्टर 15 समोरची ही दुर्घटना घडली होती. विद्यार्थ्यांना वेळीच उतरवल्याने मोठी दुर्घटना टळली. दरम्यान, आगीत स्कूल बस जळून खाक झाली.
