नीला गोखले यांची मुंबई उच्च न्यायालयात न्यायमूर्तीपदी नियुक्ती

वकील नीला गोखले यांची मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या विधि व न्याय मंत्रालयाने याबाबतची अधिसूचना मंगळवारी प्रसिद्ध केली.

सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायवृंदाने १० जानेवारी रोजी गोखले यांची उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती करण्याची शिफारस केली होती. गोखले यांच्या नियुक्तीमुळे मुंबई उच्च न्यायालयात कार्यरत न्यायमूर्तीची संख्या ६६ झाली आहे.

मालेगाव येथे २००८ सालच्या बॉम्बस्फोट खटल्यातील प्रमुख आरोपी लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित याने दोषमुक्त करण्याच्या मागणीसाठी उच्च न्यायालयात याचिका केली होती. त्यावेळी गोखले यांनी पुरोहितची बाजू मांडली होती. न्यायवृंदाच्या १० जानेवारी रोजी झालेल्या बैठकीत गोखले यांना उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून बढती देण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली होती. दरम्यान, उच्च न्यायालयात ६५ न्यायमूर्ती कार्यरत होते. गोखले यांच्या नियुक्तीनंतर ही संख्या ६६ झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *