संजय गांधी निराधार योजनेच्या नायब तहसीलदार आशा वाघ यांना भररस्त्यात पेट्रोल टाकून जाळून मारण्याचा प्रयत्न झाल्याची घटना केज येथे शुक्रवारी दुपारी घडली. अज्ञात हल्लेखोरांनी केलेल्या जीवघेण्या हल्ल्यातून त्या बचावल्या असून त्यांच्यावर केज येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दरम्यान, सहा महिन्यांपूर्वीच नायब तहसीलदार वाघ यांच्यावर कौटुंबिक कलहातून सख्ख्या भावानेच कोयत्याने प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली होती. त्यानंतर आज पुन्हा त्यांच्यावर हल्ला झाल्याने खळबळ उडाली आहे.
संजय गांधी निराधार योजनेच्या नायब तहसीलदार आशा वाघ या शुक्रवारी दुपारी तहसील कार्यालयाकडे दुचाकीवरून येत होत्या. त्याचवेळी एका चारचाकी वाहनाने त्यांचा रस्ता अडवला. त्यातून उतरलेल्या एका महिलेसह इतर चौघांनी वाघ यांच्या अंगावर पेट्रोल टाकून त्यांना जाळण्याचा प्रयत्न केला.
मात्र यातून त्या बचावल्या असून त्यांना तत्काळ केज उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. हल्लेखोर कोण होते आणि कोणत्या कारणामुळे त्यांनी हल्ला केला याचा तपास पोलीस करत आहेत. सहा महिन्यांपूर्वीच नायब तहसीलदार आशा वाघ यांच्यावर कौटुंबिक कलहातून भावानेच हल्ला केला होता. त्यामध्ये त्या गंभीर रीत्या जखमी झाल्या होत्या. त्यातच पुन्हा हा प्रकार घडल्याने खळबळ उडाली आहे.
