दिल्लीतील एनडीएम कन्व्हेन्शन सेंटर येथे भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची दोन दिवसीय बैठक पार पडली. या बैठकीदरम्यान विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. तसेच पक्षाला गुजरात विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या यशाबद्दल पंतप्रधान मोदी यांचे आभार मानण्यात आले. दरम्यान, बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत भाजपाकडून काँग्रेससह विरोधीपक्षांवर जोरदार टीकाही करण्यात करण्यात आली.
या संदर्भात बोलताना, भाजपा नेत्या तथा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण म्हणल्या, ”भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकरिणीच्या दोन दिवसीय बैठकीदरम्यान विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. यावेळी कायदा मंत्री किरण रिजीजू यांनी राजकीय ठरावदेखील मांडला. या ठरावाचे अनुमोदन उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केवश प्रसाद मौर्या यांनी केले”
पंतप्रधान मोदींचे मानले आभार
दरम्यान, यावेळी पक्षाला गुजरात विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या यशाबद्दल पंतप्रधान मोदी यांचे आभार मानण्यात आले असल्याची माहितीही त्यांनी दिली. तसेच गुजरात निवडणुकीच्या निकालाचा फायदा भाजपाला २०२४ च्या लोकसभा निवडणुकीतही होईल, असा दावा त्यांनी केला. पुढे बोलताना, पंतप्रधान मोदींमुळे आज भारताचे नाव जगाच्या पातळीवर उंचावले आहे. त्यांनी देशातही काशी विश्वनाथ कॉरिडोर, महाकाल लोक, बुद्ध सर्कीट आणि राम मंदिराचे निर्माण करून देशाची संस्कृती जपण्याचे महान कार्य केल्याचz प्रतिक्रियाही त्यांनी दिली.
