शेअर बाजारात तोटा झाल्याने पुण्यात एकाच कुटुंबातील चौघांची आत्महत्या

मुंढव्यातील केशवनगर परिसरात एकाच कुटुंबातील चौघांनी विषारी ओैषध पिऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी रात्री उशिरा उघडकीस आली. शेअर बाजारात तोटा झाल्याने चौघांनी आत्महत्येचे पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती तपासात मिळाली आहे.

दीपक थोटे ( वय ५९), इंदू दीपक थोटे ( वय ४५), ऋषिकेश दीपक थोटे (वय २४), समीक्षा दीपक थोटे (वय १७, चौघे रा. केशवनगर, मुंढवा) अशी आत्महत्या केलेल्यांची नावे आहेत. थोटे कुटुंबीय मूळचे अमरावतीचे आहे. दोन महिन्यापूर्वी ते केशवनगर परिसरात वास्तव्यास आले होते. केशवनगर भागात त्यांनी भाडेतत्वावर घर घेतले होते. दीपक थोटे यांनी शेअर बाजारात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली होती.

शेअर बाजारात नुकसान झाल्याने गेल्या काही दिवसांपासून थोटे दाम्पत्य तणावाखाली होते. त्यांची आर्थिक ओढाताण होत होती. दीपक त्यांची पत्नी इंदू, मुलगा ऋषिकेश, मुलगी समीक्षा यांनी विषारी ओैषध पिऊन आत्महत्या केल्याचे शुक्रवारी रात्री उशीरा उघडकीस आले. या घटनेची माहिती मिळताच मुंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजितकुमार लकडे आणि पथकाने घटनास्थळी धाव घेतली. चौघांचे मृतदेह वैद्यकीय तपासणीसाठी ससून रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *