मार्चमध्ये घरांच्या विक्रीत मोठी वाढ झाली असून तब्बल १ लाख ८२ हजार १४७ घरांची विक्री होऊन राज्य सरकारला ३,५५९ कोटी रुपये महसूल मिळाला होता. मात्र एप्रिलमध्ये घरविक्री गडगडली असून या महिन्यात राज्यभरात १ लाख २६ हजार ९३५ घरे विकली गेली आहेत. यातून सरकारला २,३०० कोटी रुपये महसूल मिळाला आहे.
करोना आणि टाळेबंदीचा मालमत्ता बाजारपेठेला फटका बसला होता. त्यामुळेच मार्च २०२० पासून पुढील काही वर्षे घरविक्री आणि मुद्रांक शुल्क वसुलीत प्रचंड घट झाली होती. मात्र त्यानंतर मालमत्ता बाजारपेठ सावरू लागली. असे असले तरीही घरविक्रीत सातत्याने चढ-उतार होत आहेत. मार्चमध्ये राज्यातील घरविक्रीत मोठी वाढ झाली होती. या महिन्यात तब्बल एक लाख ८२ हजार १४७ घरे विकली गेली आणि राज्य सरकारला यातून तब्बल ३,५५९ कोटी रुपये महसूल मिळाला. मात्र एप्रिलमध्ये घरविक्री गडगडली असून या महिन्यात राज्यातील १ लाख २६ हजार ९३५ घरांची विक्री झाली. म्हणजेच मार्चच्या तुलनेत एप्रिलमध्ये घरविक्रीत ५५ हजार २१२ तूट आल्याचे निदर्शनास आले. त्याच वेळी महसुलातही घट झाली आहे. मार्चमध्ये ३,५५९ कोटी रुपयांचा महसूल मिळाला होता. एप्रिलमध्ये केवळ २,३०० कोटी रुपये महसूल मिळाला आहे.
