महाराष्ट्रात दंगली व धार्मिक तणाव निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू असून देशभरातील व्यापक कटाचा हा एक भाग असल्याचे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सांगितले. महाराष्ट्रातील जनता सुज्ञ व सावध असून दिल्लीत जे घडले ते महाराष्ट्रात घडविण्याचा प्रयत्न सुरु असून तो यशस्वी होणार नाही, असेही त्यांनी सांगितले.
भाजपने राजकीय स्वार्थासाठी ओवेसीचा वापर केला. आता नवहिंदू ओवेसीचा वापर सुरू केला असल्याचा टोलाही राऊत यांनी राज ठाकरे यांचे नाव न घेता लगावला. आगामी काळात देशातील बिगर भाजपशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक मुंबईत होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंगे बंद करण्याची घेतलेली भूमिका तसेच हगुमान जयंतीला पुणे येथे हनुमान चालिसा म्हणून निर्माण केलेले वातावरण आणि अयोध्या दौरा यावरून टीका करताना संजय राऊत म्हणाले की, अयोध्येचा लढा शिवसेना लढली. आता मंदिर उभे राहात असून प्रसाद घेण्यासाठी काहीजण जाताना दिसत आहेत. अर्थात अयोध्या सर्वाची असून तेथे कोणीही जाऊ शकतो, असेही राऊत यांनी सांगितले.
