बीडमध्ये सासरच्या मंडळींनी विवाहित २० वर्षीय मुलीला तिसऱ्या मजल्यावरून फेकून दिले. गुरुवारी सकाळी तिचा मृत्यू झाल्याने मुलीच्या पित्याने दिलेल्या तक्रारीवरून मृत विवाहितेचा पती, दीर व जाऊविरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
यास्मिन शकूर शेख, असे मृत विवाहितेचे नाव आहे. तर शकूर बशीर शेख, शेख नसीर बशीर, सोफिया नसीर शेख अशी गुन्हा दाखल झालेल्या पती, दीर व जावेचे नाव आहे. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी पती शेख शकूर यास ताब्यात घेतले आहे. बीड शहरातील शाहूनगर भागात राहणाऱ्या यास्मिन शेख हिचा गुरुवारी मृत्यू झाला.
मृत यास्मिनचे वडील वडील रहीम शरिफोद्दिन शेख यांनी पोलिसात यासंदर्भात तक्रार दिली होती. २६ ऑक्टोबर २०२१ रोजी यास्मिनचा विवाह शकूर बशीर शेख (२९) याच्याशी झाला होता. शकूर हा मिस्त्री काम करतो. लग्न होऊन एक महिना उलटल्यानंतर तिचा सासरी छळ होण्यास सुरुवात झाली. सासरच्या लोकांकडून छळ होत असल्याचे यास्मिनने वडिलांना मोबाईल फोनवरून सांगितले. शेख रहिम यांनी तिची समजूत काढून ईदला घ्यायला येईन, असे वचन दिले होते. मात्र, गुरुवारी सकाळी तिसऱ्या मजल्यावरून यास्मिन पडल्याचा निरोप सासरच्या मंडळींकडून आला.
मात्र, आपल्या मुलीला फेकून दिल्याचा आरोप शेख रहीम यांनी केला असून त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून पती शकूर बशीर शेख , दीर शेख नसीर बशीर, जाऊ सोफेया नसीर शेख विरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपअधीक्षक संतोष वाळके, पोलीस निरीक्षक केतन राठोड, उपनिरीक्षक बाळराजे दराडे व सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला. या वेळी जिल्हा रुग्णालयासह पोलीस ठाणे परिसरात नातेवाईकांनी मोठी गर्दी केली होती.
