मुंबईत भेसळयुक्त दुधाची विक्री सुरूच; ५७० लिटर भेसळयुक्त दूध जप्त

दुधात होणारी भेसळ रोखण्यासाठी अन्न आणि औषध प्रशासन (एफडीए) कारवाई करीत असते. मात्र तरीही मुंबईत भेसळयुक्त दुधाची विक्री होत असल्याचे एफडीएच्या कारवाईतून निदर्शनास आले. एफडीएने सांताक्रूझ येथे छापा टाकून ५७० लिटर भेसळयुक्त दूध जप्त केले. या दुधाची किंमत २६ हजार ९२२ रुपये आहे.

एफडीएच्या मुंबई विभागाला मिळालेल्या माहितीनुसार, सांताक्रूझ येथील मेसर्स नागराज सैदालु मेडाबोनिया, रूम नंबर ३२, वाकोला ब्रिज, लोखंडवाला चाळ येथे १७ मार्चला छापा घातला. येथून ५७० लिटर भेसळयुक्त दूध जप्त करण्यात आले. या दुधाची किंमत २६ हजार ९२२ रुपये आहे. होमो पास्ट टोण्ड मिल्क (गोवर्धन फ्रेश), पास्ट डबल टोण्ड मिल्क (गोवर्धन टी स्टार) आणि पास्ट होमो काऊ मिल्क (गोवर्धन गोल्ड) दुधाचा यात समावेश आहे. दुधाच्या पिशव्यांमध्ये पाणी भरून त्या पुन्हा बंद करून भेसळयुक्त दूध ग्राहकांना विकले जात असल्याचे निदर्शनास आल्याची माहिती एफडीएचे सहआयुक्त, (अन्न), बृहन्मुंबई, शशिकांत केकरे यांनी दिली. जप्त दुधाचे नमुने तपासणीसाठी पाठविले असून अहवालानंतर पुढील कारवाई करणार असल्याचेही केकरे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *