कर्नाटकातील शाळा आणि महाविद्यालयांमध्ये हिजाब घालण्याची मागणी करणाऱ्यांना सर्वोच्च न्यायालायने एकप्रकारे धक्का दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणावर तातडीने सुनावणी घेण्यास नकार देत, योग्यवेळी सुनावणी होईल असे सांगितले आहे. एवढेच नाही तर न्यायालयाने याचिकाकर्त्यांच्या वकिलाला हिजाब वादाचा परीक्षांशी काहीही संबंध नाही, असंही सांगितलं आहे.
देवदत्त कामत यांच्या युक्तिवादावर सरन्यायाधीश एनव्ही रामण्णा म्हणाले, “परीक्षांचा या मुद्द्याशी काहीही संबंध नाही. त्याचा उल्लेख करून सनसनाटी निर्माण करू नका.” याआधीही न्यायालयाने हिजाब वादावर तातडीची सुनावणी घेण्यास नकार दिला होता, होळीच्या सुट्टीनंतर यावर विचार केला जाईल असे म्हटले होते. हे प्रकरण गुरुवारी मुख्य न्यायमूर्तींसमोर तातडीने सुनावणीसाठी ठेवण्यात आले होते. यावेळी वकील कामत यांनी, ”२८ मार्चपासून विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू होणार आहेत. अशा परिस्थितीत विद्यार्थीनीस हिजाब घालून प्रवेश दिली नाही तर तिचे एक वर्ष वाया जाईल.” असं न्यायालयात म्हटलं होतं.
