अडचणीत आले ठाकरेंचे मेहुणे? नोटबंदीमुळे पाटणकरांच्या घरी ईडीचे पाहुणे?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्यावर ईडीनं (ED) कारवाई केल्यानं खळबळ उडाली आहे. नोटबंदीमुळे अडचणीत आलेल्या हवाला ऑपरेटर नंदकिशोर चतुर्वेदी  याने पाटणकरांच्या कंपनीत बेनामी गुंतवणूक केली. हा हवाला ऑपरेटर आणि ठाकरे कुटुंबीयां संबंध काय, असा सवाल आता केला जात आहे.

रश्मी ठाकरे यांच्या भावाच्या मालकीच्या नीलांबरी इमारतीतील 11 फ्लॅट ईडीनं जप्त केले आहेत. या कारवाईचं कनेक्शन 8 नोव्हेंबर 2016 रोजी झालेल्या नोटबंदीशी असल्याचं समजतंय. नोटबंदीनंतर अनेकांनी आपल्याकडील बेहिशेबी पैसे सोन्यात गुंतवले.

नोटबंदीमुळं ठाकरेंचे मेहुणे अडचणीत? 
पुष्पक बुलियनचे चंद्रकांत पटेल आणि महेश पटेल यांनीही जुन्या नोटांच्या बदल्यात सोनं विकलं. त्यांच्या पिहू गोल्ड आणि सतनाम गोल्ड कंपन्यांमध्ये संशयास्पद व्यवहार आढळले. त्यामुळं ईडीनं पुष्पक बुलियनवर 6 मार्च 2017 रोजी केस दाखल केली. याप्रकरणी 2018 मध्ये चंद्रकांत पटेल यांना अटक झाली. पटेल यांनी पुष्पक रियालिटी कंपनीतील 20 कोटी नंदकिशोर चतुर्वेदीमार्फत बोगस कंपन्यांमध्ये गुंतवल्याचा आरोप आहे.

नंदकिशोर चतुर्वेदी हा हवाला ऑपरेटर असल्याची माहिती समोर आली आहे. त्याच्या हमसफर डीलर प्रा. लि. कंपनीनं श्रीधर पाटणकरांच्या श्री साईबाबा गृहनिर्मिती कंपनीला विनातारण 30 कोटींचं कर्ज दिलं. या बेनामी गुंतवणुकीमुळंच ईडीनं पाटणकर यांच्यावर कारवाई केली

नंदकिशोर चतुर्वेदी सध्या फरार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ईडी आणि आयकर खात्यानं त्याला शोधण्याचा प्रयत्न केला. त्याच्याविरोधात लुकआऊट नोटीस काढण्यात आलीय. दरम्यान, हवाला किंग नंदकिशोर चतुर्वेदी आणि ठाकरे कुटुंबीयांवर किरीट सोमय्यांनी गंभीर आरोप केलेत.

हवाला किंग नंदकिशोर चतुर्वेदी आणि उद्धव ठाकरे यांचे संबंध काय असा सवाल किरीट सोमय्यांनी विचारला आहे. 2014 मध्ये आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) आणि रश्मी ठाकरे यांनी तयार केलेली कंपनी नंदकिशोर चतुर्वेदीची कशी झाली असा सवाल त्यांनी विचारला.  मुख्यमंत्र्यांची झोप उडाली असेल असा टोला सोमय्यांनी लगावला आहे.

किरीट सोमय्या यांनी केलेल्या आरोपांना शिवसेना  खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी उत्तर दिलं आहे. किरीट सोमय्यांनी जे आरोप केले ते काही देशाचे मुख्य न्यायमूर्ती झाले आहे का? असा सवाल उपस्थित करत संजय राऊत यांनी ज्या पद्धतीने सिरीयल किलर असतात,  रेपिस्ट असतात त्या पद्धतीनेच हे सीरियल कम्प्लेंट झालेले आहेत,  केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर सुरु असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.

 श्रीधर पाटणकरांवरील कारवाईमुळं ईडीचे पाहुणे ठाकरे कुटुंबीयांच्या दारात पोहोचलेत. आता पुढं काय, याकडं सगळ्यांचंच लक्ष लागलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *