करोना पश्चात हृदयविकार आणि पक्षाघात होण्याचे प्रमाण वाढले आहे. मानसिक आजाराने ग्रासले असल्याने राज्यातील सर्व रुग्णालयात करोना पश्चात होत असलेल्या व्याधीसाठी बाह्य रुग्ण विभाग स्वतंत्रपणे सुरू करण्याच्या सूचना कृती दलाने शासनाला दिल्या असल्याची माहिती डॉ. संजय ओक यांनी दिली.
श्रीमती राजमती नेमगोंडा पाटील ट्रस्टच्या स्व. नेमगोंडा पाटील यांच्या ४९ व्या पुण्यतिथीनिमित्त प्रख्यात सर्जन, कोविड कृती दलाचे प्रमुख डॉ. संजय ओक यांना जनसेवा पुरस्कार तर सेवानिवृत्त मुख्याध्यापिका उषादेवी पाटील यांना स्व. राजमती पाटील विशेषसेवा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या पुरस्काराचे वितरण प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉ. शिवानंद सोरटूर यांच्या हस्ते झाले. या वेळी ट्रस्टचे मानद सचिव सुरेश पाटील, ट्रस्टी जयश्री पाटील, प्रमोद पाटील, प्रीतम चौगुले, लठ्ठे एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष शांतिनाथ कांते, सचिव सुहास पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
डॉ. ओक म्हणाले, ज्यांना लक्षणेविरहित अथवा सौम्य लक्षणांचा करोना झाला होता, अशा रुग्णांना पोस्ट कोविडचा अधिक त्रास जाणवतो आहे. मानसिक आजार, निद्रानाशाने ते ग्रस्त आहेत. रक्त गोठण्याची प्रक्रिया गतिमान झाल्याचा हा परिणाम आहे. कोविडने वैद्यकीय क्षेत्राला नव्या आव्हानाला आत्ता व पुढेही सामोरे जावे लागेल. मानद सचिव सुरेश पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. प्रा. एन. डी. बिरनाळे आणि डॉ. प्रा. शोभा पाटील यांनी सूत्रसंचालन केले. तर ट्रस्टी प्रीतम चौगुले यांनी आभार मानले.
