इंदूरमध्ये लतादिदींच्या नावे संगीत अकादमी व संग्रहालय उभारणार; मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान

भारतरत्न आणि भारताच्या गानकोकिळा म्हणून प्रसिद्ध असलेल्या लता मंगेशकर यांचं रविवारी निधन झालं. वयाच्या ९२ वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रुग्णालयात उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. लता मंगेशकर यांच्या निधनामुळे संपूर्ण भारतात शोककळा पसरली आहे. फक्त बॉलिवूड नाही तर सगळेच सोशल मीडियावरून त्यांना श्रद्धांजली देत आहेत. अशातच मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी महत्वाची घोषणा केली आहे.

इंदूरमध्ये स्व. लता मंगेशकर यांच्या नावाने संगीत अकादमी स्थापन केली जाईल. एक संग्रहालयही बांधले जाईल, ज्यामध्ये लताजींनी जे काही गायले आहे ते उपलब्ध असेल. इंदूरमध्येच त्यांचा पुतळा बसवला जाईल आणि दरवर्षी त्यांच्या वाढदिवशी लता मंगेशकर पुरस्कार दिला जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी केली आहे.

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी रविवारी सकाळी लता मंगेशकर यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करताना म्हटले होते की, “आपल्या मधुर आवाजाने अनेक पिढ्यांना जोडणाऱ्या लताजींच्या निधनाने गायनाच्या महान युगाचा अंत झाला आहे. स्वर कोकिळा आदरणीय लता मंगेशकर जी आता नाहीत. आवाजाच्या महायुगाचा आता अंत झालाय. लता दीदी तुमच्याशिवाय हा देश उजाड आहे, गाणी आणि संगीत शांत झालंय. प्रत्येक घरात आणि हृदयात पोकळी निर्माण झालीये. ती पोकळी कोणीही भरून काढू शकत नाही. तुम्हाला संगीत आणि संगीताची देवी मानून तुमची उपासना करत राहीन. लतादीदींच्या चरणी विनम्र अभिवादन.”

लता मंगेशकर यांच्या निधनाच्या दुसऱ्याच दिवशी त्यांच्या नावे संगीत अकादमी आणि संग्रहालय उभारण्याची घोषणा मुख्यमंत्री चौहान यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *