नवाब मलिकांच्या तक्रारीनंतर जिल्ह्याधिकाऱ्यांचा समीर वानखेडेंना दणका; बारचा परवाना केला रद्द

राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक आणि अमली पदार्थ नियंत्रण विभागाचे (एनसीबी) मुंबई विभागाचे माजी संचालक समीर वानखेडे यांच्यातील वादानंतर आता ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी वानखेडेंना दणका दिलाय. समीर वानखेडेंच्या मालकीच्या सद्गुरु बार आणि रेस्तराँचा परवाना रद्द केलाय. विशेष म्हणजे नवाब मलिक यांनी यासंदर्भात तक्रार केल्यानंतर ही कारवाई करण्यात आल्याची माहितीही समोर येत आहे.

एएनआय या वृत्तसंस्थेनं दिलेल्या वृत्तानुसार ठाण्याच्या जिल्ह्याधिकाऱ्यांनी सदगुरु हॉटेल आणि बारला दिलेला परवाना रद्द केलाय. या हॉटेलचे मालक समीर वानखेडे आहेत. १९९७ साली परवाना काढताना वानखेडे यांनी आपलं वय चुकीचं दाखवल्याचा ठपका ठेवत हा परवाना रद्द करण्यात आलाय.

समीर वानखेडे यांच्या नावे बार आणि रेस्तराँचा जो परवाना होता ते सद्गुरु बार आणि रेस्तराँ नवी मुंबईमधील वाशी येथे आहे. उत्पादन शुल्क विभागाच्या अहवालानुसार वाशीमधील सद्गुरु हॉटेलचा परवाना वानखेडे यांच्या नावे होता. हा परवाना २७ ऑक्टोबर १९९७ रोजी जारी करण्यात आला आहे. तसेच मध्यंतरी हा परवाना रिन्यू करण्यात आला होता. आता परवाना रद्द केला असला तरी तो ३१ मार्च २०२२ पर्यंतच पात्र होता. म्हणजेच जिल्हाधिकाऱ्यांनी दोन महिने आधीच परवाना रद्द केला असून आता या कारवाईमुळे परवाना रिन्यू करता येणार नाही. या बारमध्ये परदेशी तसेच भारतीय बनावटीच्या दारुची विक्री करण्यास परवानगी देण्यासंदर्भातील हा परवाना होता.

“समीर दाऊद वानखेडे यांचे हे फर्जीवाडा केंद्र आहे,” अशा कॅप्शनसहीत नवाब मलिक यांनी हा फोटो शेअर केला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *