तुमची घरे राष्ट्रवादी कॉंग्रेस वाचविणार, एका घरालाही धक्का देऊ देणार नाही. वेळ आली तर काय करायचे ते आपल्याला माहितीच आहे. तुमच्या घरांच्या बाजूलाच रेल्वे लाइन आहे. मध्य रेल्वेची वाहतूक तीन तास बंद झाली तर समजा अख्ख्या भारत बंद होतो. हा ट्रॅक बंद झाल्यास मनमाड, भूसावळ, कुडवाडे अडकते, कुंडवाडे बंद झाले की दक्षिणेला जाणाऱ्या गाड्या अडकतात, असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी झोपड्यांवर कारवाई झाल्यास टोकाचं पाऊल उचलण्याचा इशारा दिला. ते शनिवारी ठाण्यात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकारपरिषदेत बोलत होते.
रेल्वे प्रशासनाने रेल्वेच्या जागेवर राहणाऱ्या लोकांना सात दिवसात घरे रिकामे करण्यासंदर्भात नोटिसा धाडल्या आहेत. नोटिसा हाती पडताच नागरिकांमध्ये भीतीच वातावरण पसरले आहे. दरम्यान कल्याण पूर्व मधील आनंदवाडी परिसरात रेल्वेच्या जागेत असलेल्या घरांना देखील नोटिसा धाडल्या असून 50 वर्षांपासून या ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. इतक्या वर्ष रेल्वे झोपली होती का, असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला.
आधी पुनर्वसन करा मग घरे घ्या अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. दोन दिवसांपूर्वी खासदार श्रीकांत शिंदे यांनी डोंबिवली आणि कल्याण मधील झोपडपट्टी धारकांची भेट घेत घेतली होती. आज राष्ट्रवादीचे नेते गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी या परिसरातील रहिवाशांची भेट घेतली यावेळी त्यांनी राष्ट्रवादी या रहिवाशांच्या पाठीशी असल्याचे आश्वासन येथील नागरिकांना दिले. रेल्वेच्या या कारवाईबाबत बोलताना मंत्री आव्हाड यांनी जेव्हा सामुदायिक शक्ती रस्त्यावर उतरते तेव्हा निर्णय घ्यावा लागतो ,उद्या जर पाच लाख लोकांनी एकत्रित पणे रस्त्यावर उतरायचे ठरवलं, तर राज्य सरकार आणि केंद्र सरकार समोर अवघड परिस्थिती होईल असा सूचक इशारा दिला.
