जगभरातच पसरलेल्या करोना विषाणूविरुद्ध सर्वच देशांनी कंबर कसली आहे. सर्वच देशांनी करोना प्रतिबंधक लसीकरणाचं अस्त्र बाहेर काढलं आहे. प्रगत आणि विकसनशील देशांमध्ये लसीकरणाने आता चांगलाच वेग घेतला असला तरी गरीब देशांमध्ये मात्र लसीकरणाचं प्रमाण काही फारसं समाधानकारक नाही. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या प्रमुख अर्थतज्ज्ञ गीता गोपिनाथ यांनी याविषयी खंत व्यक्त केली आहे.
लसीकरणाच्या प्रमाणाबद्दल एक ट्विट त्यांनी केलं आहे. या ट्विटमध्ये त्या म्हणतात, जगभरातलं या आठवड्यातलं लसीकरणाचं प्रमाण जरी ४० टक्क्यांवर पोहोचलं असलं तरी आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या, गरीब राष्ट्रांमध्ये हे प्रमाण फक्त २ टक्के आहे. २०२१ या वर्षाच्या अखेरीपर्यंत सर्वच देशांमधलं लसीकरणाचं प्रमाण ४० टक्क्यांपर्यंत पोहोचवणं हे आपलं उद्दिष्ट आहे. ते साध्य करण्यासाठी श्रीमंत राष्ट्रे आणि सर्व लस उत्पादकांच्या त्वरित सहकार्याची गरज आपल्याला आहे.
एक नजर भारतातल्या आकडेवारीवर…
देशात आतापर्यंत करोना लसीचे ७५ कोटींहून अधिक डोस देण्यात आले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी सांगितले की, “या वर्षी जानेवारी महिन्यात लसीकरणाची देशव्यापी मोहीम सुरू झाल्यापासून भारतात ७५ कोटींहून अधिक कोविड लसीचे डोस देण्यात आले आहेत. जर याच वेगात लसीकरण सुरु राहिले तर डिसेंबरपर्यंत देशातील ४३ टक्के लोकांचे लसीकरण पुर्ण होईल. तसेच करोना साथीची तिसरी लाट रोखण्यासाठी भारताला वर्षाच्या अखेरीस ६० टक्के लोकांना लसीचे दोन्ही डोस द्यायचे आहेत.”
WHO ने केले भारताचे अभिनंदन
जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) भारताचे अभिनंदन केले आहे आहे. करोना लसीकरण वेगात करत असल्यामुळे त्यांनी कौतूक केले. डब्ल्यूएचओ दक्षिण-पूर्व आशियाच्या प्रादेशिक संचालक डॉ. पूनम खेत्रपाल सिंह यांनी सांगितले की, “डब्ल्यूएचओने अभूतपूर्व वेगाने करोना लसीकरण केल्याबद्दल भारताचे अभिनंदन केले. पहिले १०० दशलक्ष डोस वितरीत करण्यासाठी भारताला ८५ दिवस लागले. दरम्यान, भारताने केवळ १३ दिवसांत ६५० दशलक्ष करोना डोसपासून ७५० दशलक्ष करोना डोस देण्याचा टप्पा पूर्ण केला आहे.”
