दुर्मिळ आजारामुळे मुलगी दोन वर्षांपासून खात होती केस; सर्जरी केल्यानंतर डॉक्टरांनाही बसला धक्का

लखनौच्या बलरामपूर रुग्णालयात एक अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या रुग्णालयातील डॉक्टरांनी शस्त्रक्रियेनंतर एका मुलीच्या पोटातून केसांचा मोठा पुंजका बाहेर काढला आहे. डॉक्टरांना तिच्या पोटात चक्क २ किलो केस सापडले. ही १७ वर्षीय मुलगी गेल्या दोन वर्षांपासून फारच कमकुवत होत होती. तिला केस गळतीचा त्रास होत असल्याचंही कुटुंबीयांच्या लक्षात आलं. साधारणतः १० दिवसांपूर्वी तिने आपल्याला तीव्र पोटदुखी आणि उलट्या होत असल्याची तक्रार केली.

मुलीला होणाऱ्या या त्रासानंतर कुटुंबीयांनी तिला बलरामपूर रुग्णालयात दाखल केलं. जेथे शस्त्रक्रिया विभागाचे डॉ. एस. आर. समदार यांनी तिची तपासणी केली. अल्ट्रासाऊंड तपासणी दरम्यान डॉक्टरांना मुलीच्या ओटीपोटात एक गाठ दिसली. यानंतर, डॉक्टरांनी सीटी स्कॅन करण्याचा निर्णय घेतला. ज्यामध्ये पुन्हा एक मोठी गाठ दिसून आली.

केसांच्या पुंजक्याचं रूपांतर गाठीत

पुढे एन्डोस्कोपनंतर तिच्या ओटीपोटात केसांचा पुंजका असल्याचं आढळलं. तिच्या पोटातील केसांच्या पुंजक्याचं रूपांतर चक्क एका गाठीत झालं होतं. याचं वजन सुमारे दोन किलो होतं. तिच्या पोटात २० सेमी रुंदीचा हा पुंजका पाहून डॉक्टर देखील चक्रावले. यावेळी, डॉक्टरांनी सांगितलं की, मुलगी जन्मापासून मानसिक आजाराने ग्रस्त होती.

दुर्मिळ आजाराने ग्रस्त

सुमारे दीड तास चाललेल्या या शस्त्रक्रियेनंतर या मुलीला आता पोटदुखीची कोणतीही समस्या जाणवत नसून तिची प्रकृती सुधारत आहे. दरम्यान, या गाठीमुळे तिच्या पोटातून लहान आतड्यापर्यंतची जागा पूर्णपणे बंद झाली होती. परिणामी, अन्न पुढे जाऊ शकत नव्हतं. ज्यामुळे तिचं साधारणतः ३२ किलो वजन कमी झालं होतं. दुसरीकडे ही मुलगी ट्रायकोबेझार (Trichobezoar) या दुर्मिळ आजाराने ग्रस्त होती. या आजारात रुग्ण स्वतःचे केस तोडून खातात.

शस्त्रक्रिया हा एकमेव मार्ग होता

डॉक्टरांनी सांगितलं की, रुग्णाच्या पोटात केसांचा एक पुंजका होता. मानवी पचनसंस्थेत वर्षानुवर्षे केस पचत नाहीत. त्यामुळे ते पोटात जमा होऊन राहिले. म्हणूनच यावर उपचार करण्याचा एकमेव मार्ग होता तो म्हणजे शस्त्रक्रिया.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *