खड्डय़ाच्या दणक्यामुळे पिशवीतला साप बाहेर आल्याने धावत्या रिक्षाला अपघात

खड्डय़ाच्या दणक्यामुळे पिशवीतला साप बाहेर आल्याने धावत्या रिक्षाला अपघात

धावत्या ऑटोमध्ये अचानक साप आढळल्याने चालकाचे नियंत्रण सुटून अपघात झाल्याची घटना बुलढाणा-देऊळघाट मार्गावर बुधवारी रात्री घडली. या अपघातात प्रल्हाद रामजी हिवाळे (५४, रा. देऊळघाट) यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर सुपडा कौतिकराव हिवाळे, गणेश शिवलाल बिबे, मनोज सुखदेव जाधव आणि चालक रशीद मिर्झा (सर्व रा. देऊळघाट) हे चार जण जखमी झाले आहेत.

देऊळघाट येथील काही मजूर हे बुलढाणा येथील काम आटोपल्यावर ते रात्री ऑटोतून परत जात होते. रस्त्यावरील खड्डय़ामुळे धावत्या ऑटोला दणका बसला. त्या दणक्यामुळे एका मजुराच्या जेवणाचा डबा ठेवलेल्या पिशवीमधून अचानक साप बाहेर आला. या गोंधळात वाहन चालकाचेही नियंत्रण सुटल्याने ऑटो उलटून अपघात झाला. त्या पिशवीत साप असल्याची कल्पनाही मजुरांना नव्हती. या प्रकारामुळे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून हा अपघात झाला. ज्या ठिकाणी ते मजूर काम करत होते, त्याच ठिकाणी मजुराच्या पिशवीत साप गेला असावा आणि ऑटोत तो खड्डय़ाच्या दणक्यामुळे बाहेर आला, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *