राज्य सरकारने दहीहंडी आयोजनास परवानगी नाकारली असतानाही ठाणे शहरात मनसेने दहीहंडीचे आयोजन करण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवारी सकाळी मनसेची मंडप उभारण्याची तयारी सुरू असताना ठाणे पोलिसांनी मनसेचे नेते अविनाश जाधव यांच्यासह १८ पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याविरोधात नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. या घटनेनंतर मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी राज्य सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. दहीहंडीसाठी उभारण्यात आलेला मंडपही पोलिसांनी काढून टाकला. त्यामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण होते.
राज्यात करोनाचा प्रादुर्भाव कायम असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दहीहंडीच्या आयोजनास परवानगी नाकारली आहे. ठाणे शहरात सर्वच पक्षांच्या नेत्यांकडून लाखो रुपयांच्या बक्षिसांच्या दहीहंडीचे आयोजन केले जाते. मात्र उद्धव ठाकरे यांच्या आवाहनानंतर शिवसेनेच्या नेत्यांनी दहीहंडी आयोजन रद्द करण्याचा निर्णय घेतला. असे असले तरी मनसेने दहीहंडी उत्सव साजरा करण्याचा निर्णय कायम ठेवला होता. गेल्या दोन दिवसांपासून नौपाडा येथील भगवती शाळेच्या मैदानामध्ये मनसेने मंडप उभारण्याची तयारी सुरू केली होती. नियमांचे उल्लंघन होऊ नये म्हणून नौपाडा पोलिसांनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांना आणि दहीहंडी साजरी करण्यास उत्सुक असलेल्या गोविंदा पथकांना नोटिसा पाठविण्यास सुरुवात केली होती.
करोनाच्या प्रादुर्भावामुळे दहीहंडी उत्सव साजरा करू नये, अशी सूचना मनसेच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी नोटीसद्वारे केली होती, मात्र त्यानंतरही सोमवारी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी भगवती शाळेच्या मैदानात जमून मंगळवारी होणाऱ्या दहीहंडीची तयारी सुरू केली. याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर उपायुक्त अविनाश अंबुरे, साहाय्यक पोलीस आयुक्त व्यंकट आंधळे यांच्यासह नौपाडा पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मनसेच्या १८ कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. तसेच त्यांच्याविरोधात आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. दहीहंडीच्या आयोजनासाठी बांधण्यात आलेला मंडपही पोलिसांनी काढला. दुपारी उशिरापर्यंत भगवती मैदानात नौपाडा पोलिसांचा बंदोबस्त कायम होता.
