कराडमध्ये दोघांना वनकोठडी

कराडमध्ये दोघांना वनकोठडी

वाघ व बिबटय़ांच्या नखांची विक्री करणाऱ्या दोघा तरुणांकडून ११ नखे मिळून आल्याची खळबळजनक घटना कराड येथे उघडकीस आली. वनखात्याच्या या अत्यंत महत्त्वाच्या कारवाईत दोघाही तरुणांना वनकोठडी मिळाली असून, त्यांचा आंतरराज्य टोळीत सहभागाची शक्यता व्यक्त होत आहे. सदर गुन्ह्यतून वाघ व बिबटय़ाची शिकार झाल्याचेही स्पष्ट होत असल्याने हे रॅकेट उघडकीस आणण्याचे आव्हान वनखात्यासमोर असून, ते हा तपास कसा तडीस नेतात हे महत्त्वाचे ठरणार आहे.

वाघ व बिबटय़ांची ११ नखे हस्तगत करताना दिनेश बाबूलालजी रावल (३८, रा. सोमवार पेठ, कराड) आणि अनूप अरुण रेवणकर (३६, रा. रविवार पेठ, कराड) अशा दोघांना वनखात्याने बेडय़ा ठोकल्या. गोपनीय माहितीवरून वनखात्याने सापळा रचला होता. दरम्यान, येथील कृष्णा नाक्यावर दिनेश रावल हा दोन वाघनख्या घेऊन विक्रीसाठी आला. त्या वेळेस वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी त्याला झडप घालून पकडले. त्याला ताब्यात घेऊन लगेचच दुसरा संशयित अनूप रेवणकरच्या रविवार पेठ काझीवाडय़ाजवळील मयूर गोल्ड या दुकानावर धाड टाकण्यात आली. त्यात अनूप रेवणकरजवळून  वाघ व बिबटय़ाची आठ नखे मिळून आली. अधिक झडतीत आरोपीच्या गळय़ात एक वाघ नख सापडले. अशी एकूण ११ नखे हस्तगत करताना वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार रावल व रेवणकर या दोघांना अटक करण्यात आली. त्यांना न्यायालयाने चार दिवसांची वनकोठडी सुनावली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून वनविभाग व वन्यजीव अपराध नियंत्रण ब्युरोचे अधिकारी दिनेश रावल व अनूप रेवणकर यांच्यावर पाळत ठेऊन होते. अखेर हे दोघे मुद्देमालासह पकडले गेले. उपवनसंरक्षक महादेव मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक वनसंरक्षक महेश झांजुर्णे, वनक्षेत्रपाल तुषार नवले, वन्यजीव अपराध नियंत्रण ब्युरो मुंबईचे निरीक्षक डोकी आदीमाल्या, मानद वन्यजीवरक्षक रोहन भाटे आदींनी ही कारवाई फत्ते केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *