जलतरण तलाव सुरू करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

करोना साथीच्या पाश्र्वभूमीवर महाराष्ट्रातील सर्व जलतरण तलाव बंद आहेत. मात्र आता हळूहळू र्निबध शिथिल करण्यात येत असताना जलतरण तलावही सुरू करण्याची परवानगी मिळावी, याबाबत महाराष्ट्र जलतरण संघटनेने राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे साकडे घातले आहे.

गेल्या वर्षी मार्च महिन्यात करोनामुळे देशभरात टाळेबंदी लागू करण्यात आली. मात्र जलतरण हा खेळ कोणत्याही शारीरिक संपर्काशिवाय खेळला जातो. तसेच जलतरण तलावातील क्लोरिनयुक्त पाण्यामुळे करोनाचा फैलाव होत नाही, हे जागतिक आरोग्य संघटनेने मान्य केले आहे. गेल्या वर्षभरापासून तलाव बंद असल्याने अनेक खेळाडूंची कारकीर्द धोक्यात आली असून प्रशिक्षकांवरही बेरोजगारीची परिस्थिती ओढवली आहे, असे महाराष्ट्र जलतरण संघटनेचे अध्यक्ष दीपक मेजारी यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.

अर्जुन पुरस्कार विजेता जलतरणपटू वीरधवल खाडेनेसुद्धा काही महिन्यांपूर्वी जलतरण तलाव सुरू करण्याची मागणी केली होती. मात्र रविवार, ८ ऑगस्ट रोजी जाहीर करण्यात आलेल्या नव्या र्निबधांमध्ये जलतरण तलाव खुले करण्याबाबत कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. त्यामुळे याबाबत लवकर निर्णय घ्यावा, असे आवाहन मेजारी यांनी मुख्यमंत्र्यांना केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *