अनिल देशमुखांवर गुन्हा दाखल झाल्याने गृहमंत्री तातडीने वर्षा बंगल्यावर दाखल

 राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या मालमत्तेवर केंद्रीय अन्वेशन विभागाने छापे टाकल्याची माहिती समोर येत आहे. त्यासोबतच देशमुख यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी वर्षा बंगल्यावर दाखल झाले आहेत. देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याच्या पार्श्वभूमीवर ही महत्वाची भेट मानली जात आहे.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी खंडणीचा आरोप केला होता. तसे पत्र त्यांनी मुख्यमंत्र्यांना लिहले होते. त्यानंतर राज्याच्या राजकीय वातावरणात मोठी खळबळ उडाली होती.  अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या आरोपांमुळे न्यायालयाने सीबीआयला याप्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले होते. त्यानंतर देशमुख यांनी मंत्री पदाचा राजीनामा दिला होता.

खंडणी प्रकरणाची प्राथमिक चौकशी पूर्ण झाल्यानंतर सीबीआयने देशमुख यांच्या मालमात्तांवर छापा टाकल्याची माहिती समोर आली आहे. मुंबईसह राज्यातील 10 ठिकाणी ही छापेमारी सुरू असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. सीबीआयने याप्रकरणी देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

त्यामुळे राज्याचे विद्यामान गृहमंत्री दिलीप वळसे पाटील मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी वर्षा बंगल्यावर गेले आहेत. वळसे पाटील यांचा आज पुणे दौरा होता, मात्र या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर त्यांनी आपला पुणे जिल्ह्याचा दौरा रद्द केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *