चित्रपटातील एखाद्या थरारक दृश्याप्रमाणे मंगळवारी सायंकाळी सहा वाजता डोंबिवली वाहतूक शाखेतील एका हवालदाराने एका बेशिस्त रिक्षाचालकाला फडके रस्ता भागात पकडले. या रिक्षाचालकावर कायदेशीर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे, असे वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गित्ते यांनी सांगितले.
करोना रुग्णसंख्येत वाढ झाल्यानंतर राज्य शासनाने रिक्षातून एकावेळी दोनच प्रवाशांची वाहतूक करण्यास परवानगी दिली आहे. या आदेशाचे अनेक रिक्षा चालक पालन करीत आहेत. असे असले तरी काही रिक्षाचालक एकावेळी चार ते पाच प्रवाशांची वाहतूक करीत असून यामुळे करोनाचा संसर्ग वाढण्याची भीती व्यक्त होत होती. याबाबत वाहतूक पोलिसांकडे नागरिकांच्या तक्रारी येत होत्या. त्याआधारे करोना प्रतिबंधाचे नियम तोडून प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षाचालकांवर कारवाई करण्याचे आदेश वरिष्ठ पोलीस निरीक्षक गित्ते यांनी दिले होते.
डोंबिवली वाहतूक शाखेतील पोलीस ठाकुर्ली उड्डाणपुलाच्या पश्चिम बाजूला मंगळवारी सायंकाळी वाहन तपासणी करीत होते. त्यावेळी एका रिक्षातून जास्त प्रवासी वाहतूक होत असल्याची बाब हवालदार के. पी. शिंदे यांच्या निदर्शनास आली. त्यामुळे त्यांनी रिक्षाचालकाला थांबण्यास सांगितले. मात्र, चालक न थांबता वेगाने निघून गेला. हवालदार शिंदे यांनी उड्डाणपूल ते स. वा. जोशी शाळेपर्यंत एका खासगी दुचाकीस्वाराच्या पाठीमागे बसून संबंधित रिक्षेचा पाठलाग केला. आपला पाठलाग होतोय हे लक्षात येताच चालकाने वेगाने रिक्षा पुढे नेली आणि त्यानंतर जोशी शाळेजवळ रिक्षा सोडून त्याने नेहरू मैदान दिशेने गल्लीतून पळ काढला. हवालदार शिंदे यांनी पाठलाग करून त्याला पकडले. त्याची तपासणी केली असता त्याच्याजवळ वाहतूक परवाना, रिक्षेची कोणतीही कागदपत्रे नव्हती. त्याची रिक्षा जप्त करण्यात आली असून या चालकावर कायदेशीर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे, असे वाहतूक विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले. काही रिक्षाचालक आपण पोलीस मित्र, परिवहनमंत्र्यांचे नातेवाईक असल्याचे सांगून दादागिरी करत प्रवाशांकडून वाढीव भाडे, वाहनतळावरून प्रवासी वाहतूक न करणे, प्रवाशांसोबत गैरवर्तणूक करीत असल्याच्या तक्रारी आहेत. अशाच एका चालकावर विष्णूनगर पोलिसांनी कारवाई केली आहे.
